October 14, 2025

२ जून रोजी ‘उगम’ या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. २७ मे, २०२४ : सुप्रसिद्ध संवादिनीवादक तन्मय देवचके यांच्या स्वरानुजा या म्युझिक अकादमीच्या वतीने  ‘उगम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  उगम या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष असून रविवार दि. २ जून रोजी कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सायं ५.३० वाजता सदर कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.

‘उगम’ या कार्यक्रमाची सुरुवात तन्मय देवचके यांच्या विद्यार्थ्यांच्या विशेष सादरीकरणाने होईल. तन्मय यांचे विद्यार्थी जगभरात विविध ठिकाणी असून यावेळी यातील निवडक शिष्य उपस्थितांसमोर आपले संवादिनी वादन सादर करतील. मेवाती घराण्याचे ख्यातनाम गायक पं संजीव अभ्यंकर हे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

कार्यक्रमा दरम्यान तन्मय देवचके यांचा ‘तन्मय इन हार्मनी’ हा विशेष कार्यक्रम संपन्न होईल. यामध्ये तन्मय यांनी बनविलेल्या काही नवीन रचनांचे सादरीकरण ते स्वत: करणार आहेत. कार्यक्रमामध्ये तन्मय पवार (गिटार), जय सूर्यवंशी (की बोर्ड), अभिषेक भूरूक (ड्रम्स), सोहम गोराने (तबला), नीरज पंडित (बास गिटार) हे साथसंगत करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी अरगडी करणार आहेत.

तन्मय देवचके यांचे आजोबा गोपाळ देवचके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यावर्षीपासून आश्वासक  संवादिनीवादकाला श्री गोपाळ देवचके शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल. यावर्षी पं संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते ही शिष्यवृत्ती मंगळूर येथील विश्वजित किणी यांस प्रदान करण्यात येईल अशी माहिती तन्मय देवचके यांनी कळविली आहे.