पुणे, दि. २ जुलै, २०२४ : युवा कलाकारांच्या सादरीकरणाद्वारे गायन, वादन आणि नृत्य असा त्रिवेणी संगम युव रंग का विशेष कार्यक्रमामध्ये रसिकांनी अनुभविला. पं. अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य व गायक अमोल निसळ यांच्या स्वरनिनाद संस्थेतर्फे नुकताच टिळक रस्त्यावरील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मैत्रेयी भोसले (गायन), सोहम गोराणे (तबला), अनिरुद्ध ऐथल (गायन), षड्ज घोडखिंडी (बासरी), रागिणी देवळे (गायन), सुरंजन जायभाये (गायन), आशिष- श्रेयस- वेधा- सिद्धी (व्हायोलिन) आणि राधिका करंदीकर (नृत्य) या कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
‘स्वरनिनाद’ या संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या गंगाधर स्वरोत्सवाच्या दहाव्या वर्षाचे औचित्य साधत युव रंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरंजन जायभाये यांच्या गायनाने कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी राग खमाज मध्ये ठुमरी गायली. ‘आये ना बालम…’ या रचनेने त्यांनी समारोप केला. यानंतर आशिष बेहेरे, श्रेयस अभ्यंकर, वेधा पोळ आणि सिद्धी देशपांडे यांनी आपल्या गुरु स्वप्ना दातार यांचा ‘स्वरस्वप्न’ हा व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम सादर केला. उत्तम तालीम, सादरीकरणामधील प्रभुत्व यांचे दर्शन यावेळी झाले. यावेळी स्वप्ना दातार यांनी निरुपण केले.
यानंतर मैत्रेयी भोसले यांचे गायन झाले. त्यांनी राग हंसध्वनी गायला. राजस्थानी मांड मधील रचनेने त्यांनी समारोप केला. यानंतर षड्ज घोडखिंडी यांचे बासरीवादन रंगले. त्यांनी यावेळी राग मीराबाई की मल्हार आणि राग रागेश्री आदींचे गायकी अंगाने सादरीकरण केले. त्यांना अजिंक्य जोशी यांनी तबलासाथ केली.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात राधिका करंदीकर यांच्या नृत्याने झाली. यावेळी त्यांनी झपताल आणि काही बंदिशींची बहारदार प्रस्तुती केली. अभिनय अंगाने पारंपारिक ठुमरी सादर करीत त्यांनी समारोप केला. यानंतर रागिणी देवळे यांचे गायन सादर झाले. त्यांनी राग मधुवंती गायला. यानंतर सुप्रसिद्ध तबलावादक पं योगेश समसी यांचे शिष्य असलेल्या सोहम गोराणे यांनी केलेल्या तबलावादनाला उपस्थितांनी दाद दिली. त्यांनी पेशकार, उपज आणि कायदा यांचे सादरीकरण केले. यानंतर अनिरुद्ध ऐथल यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांनी यावेळी राग कौशी कानडा व राग गौड मल्हारची प्रस्तुती केली. अभंग सादर करीत त्यांनी समारोप केला. सर्व कलाकारांना यावेळी अभिनय रवंदे, कार्तिक स्वामी, यशद गायकी, अथर्व कुलकर्णी, शुभम शहा, अजिंक्य जोशी यांनी साथसंगत केली.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी