पुणे, २६ जुलै २०२४: खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरले. मात्र, सर्वाधिक पाणी सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी परिसरात शिरले. त्यामुळे पुराचे पाणी शिरणाऱ्या भागात सीसीटीव्ही लावले जातील, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. शहराच्या विविध भागातील नागरी वस्तीमध्ये पाणी शिरणाऱ्या भागात सीसीटीव्ही लावणे, पाऊस मोजणारी यंत्रे (रेन गेज) उभारणे आदी कामे प्राधान्याने केली जातील. तसेच पुराच्या धोक्याविषयी नागरिकांना जागृत करण्यासाठी अग्निशामक दल व पोलिसांची मदत घेतली जाते. रिक्षातूनही माइकवर इशारा दिला जातो. आता अन्य यंत्रणांच्या माध्यमातूनही नागरिकांना कसे सतर्क करता येईल, यावर काम केले जाईल.पाणी शिरलेल्या भागात स्वच्छतेची कामे सुरू आहेत. गाळ, कचरा काढण्यासाठी जेसीबी, जेटिंग मशिन व अन्य आवश्यक यंत्रणा पुरवल्या आहेत. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली जात आहे. तसेच अन्य क्षेत्रीय कार्यालयांमधून अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध करून दिल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
पंचनामा पुर्ण करून अहवाल पाठविला जाईल
पूरपरिस्थितीमुळे ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्या मालमत्तेचा पंचनामा शनिवारपर्यंत पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जाईल असे आयुक्त डॉ. भोसले यांनी सांगितले.
विर्सगाबाबत जलसंपदा विभाग जिल्हाधिकाऱ्यांकडे खुलासा देईल
नदीत पाणी सोडले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून कळवले गेले होते. मात्र, प्रत्यक्षात विसर्ग वाढविण्यात आला. खुल्या पाणलोट क्षेत्रातून आलेल्या पाण्यामुळे विसर्ग वाढल्याचा दावा जलसंपदा विभाग करत आहे. मात्र, हे प्रमाण इतके अधिक असू शकत नाही. त्यामुळे जलसंपदा विभाग आपला खुलासा जिल्हाधिकाऱ्यांकडे देईल, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.
नदीकाठसुधार तपासू
नदीकाठ सुधार साठी बंडगार्डन परिसरात केलेल्या कामामुळे पाणी अडले, आणि त्यामुळे अलिकडच्या भागात पूर आला, असा आरोप केला जात आहे. त्याविषयी विचारले असता, आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, आत्ताच त्याबद्दल बोलता येणार नाही. नदीकाठसुधार प्रकल्पाला जलसंपदा विभागासह सर्वांची मान्यता घेण्यात आली आहे. मात्र, याबाबत माहिती घेतली जाईल, सर्व गोष्टी तपासून पाहण्यात येतील.

More Stories
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : जागतिक सायकलपटूंसाठी पुण्याचा उत्साहवर्धक अनुभव
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ढोल-ताशे, शिवगर्जना आणि सेल्फी, प्रोलॉग रेसमध्ये पुणेकरांचा रंगारंग स्वागत
यंदाचे ‘एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन’ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना समर्पित