January 17, 2026

पुणे: गरजू रुग्णांच्या उपचाराकरीता अभ्यंकर दाम्पत्याचा पुढाकार

पुणे, दि. २९ जुलै २०२४: आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचाराने निवृत्तीनंतर पुण्यातील डॉ दिवाकर व दीपा अभ्यंकर या दाम्पत्याने आपल्या आई वडिलांच्या नावे एसीई रुग्णालय आणि सह्याद्री रुग्णालय यांना प्रत्येकी रु तीन लाख इतकी देणगी सुपूर्त केली आहे. या देणगीद्वारे गरजू रुग्णांवर उपचार व्हावेत, हा अभ्यंकर दाम्पत्याचा त्यामागील विचार आहे. नुकतेच एसीई रुग्णालय व संशोधन सेंटरचे संस्थापक डॉ सुरेश पाटणकर यांकडे अभ्यंकर दाम्पत्याने या धनादेश सुपूर्त केला.

डॉ दिवाकर अभ्यंकर हे कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया, क्रेडाई – पुणे मेट्रो महासंचालक म्हणून नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्या आधी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए)चे महासंचालक म्हणून त्यांनी काम पहिले आहे. या क्षेत्रात ते गेली ५५ वर्षे कार्यरत आहेत हे विशेष.

आपल्या निवृत्तीनंतर क्रेडाईच्या गरजू कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय उपचार आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी डॉ डी के अभ्यंकर यांनी रोख रुपये ५ लाख इतकी मदतही देऊ केली आहे. शिवाय सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ किंवा नॅशनल इंस्टीट्युट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च (एनआयसीएमएआर) या संस्थांमधील बांधकाम व्यवस्थापन विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक देण्यासाठी त्यांनी निधी दिला आहे. आपल्या प्रदीर्घ सेवेसाठी डॉ अभ्यंकर यांचा नुकताच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला होता.