पुणे दि.१५/१०/२०२४: पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे चारचाकी वाहनांसाठी लवकरच सुरू होत असलेल्या ‘एलवाय’ मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून राखून ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नव्याने सुरु होणाऱ्या परिवहन मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा वाहन मालकांनी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल.
यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधीत अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये यांनी केले आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही