पुणे, दि. २३ ऑक्टोबर २०२४: आधुनिक तंत्रज्ञानासोबतच आधुनिक साहित्याची कास धरीत निसर्गपूरक शहर नियोजनाचा ध्यास घेतलेल्या एका भविष्यवेधी वास्तुरचनाकाराला, यशस्वी शहर नियोजकाला, तत्वनिष्ठ व्यावसायिकाला आणि सह्दयी मित्राला आपण मुकलो आहोत अशा शब्दांत प्रसिद्ध अमेरिकन-भारतीय वास्तुविशारद असलेल्या ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या आठवणींना आज पुण्यात उजाळा देण्यात आला.
जन्माने अमेरिकी असलेल्या बेनिंजर यांनी आपल्या आयुष्याचा सहा दशकांहून अधिक काळ भारतात व्यतीत केला, पुण्याला त्यांनी आपली कर्मभूमी मानले. अशा ख्रिस्तोफर बेनिंजर या जगप्रसिद्ध वास्तूरचनाकाराचे नुकतेच २ ऑक्टोबर रोजी दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज एरंडवणे येथील शकुंतला शेट्टी सभागृह येथे दी इंडियन इंस्टीट्युट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए) पुणे विभाग, आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन (एआयएसए), इंडियन इंस्टीट्युट ऑफ इंटीरिअर डिझायनर्स (आयआयआयडी) पुणे विभाग, वाईड अँगल फोरम आणि सीसीबीए यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
अहमदाबाद येथील सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नोलॉजी (सीईपीटी) विद्यापीठाचे अध्यक्ष आणि नवे संसद भवन व सेंट्रल व्हिस्टा ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्पाचे वास्तुविशारद पद्मश्री बिमल पटेल, लोढा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लोढा, लोढा पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिकम जैन, प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते नावेद अस्लम, आयआयए पुणे विभागाचे अध्यक्ष वास्तुविशारद विकास अचलकर, उपाध्यक्ष वास्तुविशारद सीतेश अग्रवाल, एआयएसएचे अध्यक्ष महेश बांगड, आयआयआयडीचे अध्यक्ष अजय पंचमटीया, नागार्जुन ट्रेनिंग इंस्टीट्युट, नागलोकाचे संस्थापक धम्मचारी लोकामित्रा, वाईड अँगल फोरमच्या संस्थापिका प्रिया गोखले, ब्रिक गृप ऑफ इंस्टीट्युटच्या सचिव पूजा मिसाळ, ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक रामप्रसाद अक्कीसेट्टी, दरायस चौक्सी, राहुल साठे, पुस्तकाचे संपादक करण गांधी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शहरातील अनेक वास्तुरचनाकार, बांधकाम व्यावसायिक, शहर नियोजक, या क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर, विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक आदींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती लावत बेनिंजर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
ख्रिस्तोफर बेनिंजर लिखित ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स, अ नोट्स टू अॅन आर्किटेक्ट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर पुस्तक हे बेनिंजर लिखित बेस्टसेलर ठरलेल्या ‘लेटर्स टू अ यंग आर्किटेक्ट’ या पुस्तकाचा पुढचा भाग आहे.
ज्या काळी भारतातून अनेक जण परदेशात उड्डाणे करीत होते त्या काळी अमेरिकेत जन्माला आलेल्या ख्रिस्तोफर यांनी भारताला स्वत:चे घर बनविले आणि येथील अनेक गोष्टींमध्ये समर्पण भावनेने, उत्साहाने आणि आनंदाने दीर्घकालीन ठसा उमटविणारा बदल करण्याचा यशस्वी प्रयत्न केला असे सांगत बिमल पटेल म्हणाले, “अॅन्गुलर – फ्लोइंग जिओमेट्री, आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक साहित्य आणि साधी सजावट हे ख्रिस्तोफर यांनी घडविलेल्या इमारतींचे वैशिष्ट्य होते. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर एक आशावादी समाज आणि नव्या कल्पनांचा देश घडविण्याच्या ६०-७० च्या दशकातील वातावरणाने ख्रिस्तोफर यांना भारतात राहण्यास उद्युक्त केले. या काळात आधुनिकीकरणाच्या दिशेने झेप घेणाऱ्या भारतात अनेक महत्त्वपूर्ण संस्थांची उभारणी ख्रिस्तोफर यांनी केली. त्यांच्या जाण्याने एक कालजयी, द्रेष्टा वास्तुरचनाकार आपल्यातून निघून गेला आहे.”
ख्रिस्तोफर एक तांत्रिक दृष्ट्या उत्कृष्ट वास्तुरचनाकार होतेच शिवाय तत्त्वनिष्ठ व्यावसायिक आणि एक उदार, सहयोगी मित्र होते. आम्हाला एकमेकांच्या कामाचा आदर होता अशा शब्दांत पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बेनिंजर यांनी भूतान येथे उभारलेल्या प्रकल्पांचे साक्षीदार असलेले भूतानाचे पहिले पंतप्रधान जिंगमी थिनली यांनी ‘भूतानचे सच्चे मित्र’ अशा शब्दांत बेनिंजर यांना आदरांजली वाहिली. टर्की येथील सुहा ओस्गान, ढाका येथील बंगाल फाउंडेशनच्या महासंचालिका लुवा चौधुरी यांनीही यावेळी व्हिडीओ माध्यमातून आपल्या आठवणी सांगत बेनिंजर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बेनिंजर यांचा भारतीय वास्तुशिल्पकलेची जाण असलेला वास्तुविशारद अशा शब्दांत उल्लेख करीत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (आयजीएनसीए)चे प्रमुख सच्चिदानंद जोशी म्हणाले, नव्या संसद भवनामध्ये वास्तुकलेशी संबंधित कोणत्या गोष्टी असाव्या यावर जेव्हा आम्ही विचार करत होतो तेव्हा त्याविषयी मदत करू शकणारी व्यक्ती म्हणून ख्रिस्तोफर यांचे नाव सर्वांत पहिल्यांदा आमच्या पुढे आले. संसद भवनाच्या इमारतीला जेव्हा त्यांनी भेट दिली तेव्हा गर्डर उभारून इमारतीचे बांधकाम सुरु होते. त्यावेळी सिमेंट, माती, दगड यांच्या सान्निध्यात साकारत असलेल्या इमारतीचे सौंदर्य लोभस असते असे बेनिंजर म्हणाले होते अशी आठवण जोशी यांनी सांगितली.
अभिषेक लोढा आणि पूजा मिसळ यांनी ख्रिस्तोफर कसे पुढच्या पिढ्यांशी आपसूक जोडले जायचे हे सांगत त्यांच्या आठवणी सांगितल्या. नावेद अस्लम आणि रामप्रसाद अक्कीसेट्टी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी बेनिंजर यांच्या कामाचा आढावा घेणारी ध्वनीचित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. प्रिया गोखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, रामप्रसाद अक्कीसेट्टी यांनी आभार मानले.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी