पुणे, १३/११/२०२४: महापालिकेत समाविष्ट होऊन काही दशके झाल्यानंतरही खराडी परिसराचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार आणि घरात दोन नगरसेवक अशी गेली ३० वर्ष सत्ता असतानाही येथील स्थानिक लोकप्रतिनिधीला पाण्याचा प्रश्न सोडविता येऊ शकला नाही हे दुर्दैव आहे. मात्र आगामी काळात भामा आसखेड योजनेच्या माध्यमातून खराडी परिसराला पाणी पुरवठा करून या भागाला टॅंकरमुक्त करु असे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार सुनिल टिंगरे यांनी स्पष्ट केले.
आमदार सुनिल टिंगरे यांनी खराडी भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिक संवाद साधला. यावेळी नागरिकांनी येथील पाणी प्रश्र्न त्यांच्या समोर मांडला. यावेळी आमदार टिंगरे म्हणाले, २०१२ साली मंजुरी मिळालेला भामा आसखेड प्रकल्प अनेक कारणांमुळे रखडलेला होता. त्याबाबत पाठपुरावा करून ३८० कोटींचा हा प्रकल्प माझ्या कार्यकाळात पूर्ण झाला आहे. महापालिकेत अनेक वर्ष प्रतिनिधीत्व करणाऱ्या खराडी, चंदननगर भागातील पुढाऱ्यांना खराडीला पाणी देता आलेले नाही. येथे टँकर व्यावसायिक जोमात आणि जनता कोमात अशी अवस्था आहे. त्यामुळे खराडीला टँकरमुक्त करण्याची इच्छाशक्ती येथील नेतृत्वात नाही. माझ्या पुढील कार्यकाळात धानोरी , विद्यानगरप्रमाणेच खराडी भागालाही टँकरमुक्त करणार असल्याचे आश्वासन आमदार टिंगरे यांनी दिले. पदयात्रेत सचिन सातपुते, शैलाजित बनसोडे, स्वप्नील पठारे, दर्शना पठारे, ज्योती जावळकर, अनिल नवले, गुलाब पठारे, सोमनाथ पठारे, विकास पठारे, किरण खैरे, आशा जगताप, स्वप्नील चव्हाण, शंकर संगम, समीर शेख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर रस्ता सिग्नलमुक्त करण्याचे टिंगरे यांचे नागरिकांना आश्वासन:
वाघोली, खराडी, चंदननगर, वडगावशेरी भागातील नागरिकांना नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र आता काही भागातील बीआरटी काढली आहे. तसेच उर्वरित बीआरटी काढण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. येत्या काळात शिरूर – पुणे उड्डाणपूल रामवाडीपर्यंत नेण्यात येणार आहे. तसेच, खराडी बायपास, शास्त्रीनगर चौक आदी भागात ग्रेड सेपरेटर उड्डाणपूल यांसाठी निधी मंजूर करून घेतलेला आहे. त्यामुळे भविष्यात नगर रस्ता सिग्नल मुक्त होईल, असा विश्वास टिंगरे यांनी व्यक्त केला.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही