बारामती, दि: २८/01/2025: ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, रोशीनी ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशन, नागरिक विकास अध्ययन संस्थान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० जानेवारी या कालावधीत शारदानगर येथे स्वयंसिद्धा युवती संमेलन संपन्न होत आहे.
दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात मुक्तांगण, पुणेच्या संचालिका मा. डॉ. मुक्ता पुणतांबेकर, “महिला आणि व्यसनाधीनता” या विषयावर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या,” पूर्वी फक्त पुरुषच व्यसन करायचे, पुरुषाच्या व्यसनाला महिलांना जबाबदार धरलं जायचं, पुरुषांच्या व्यसनामुळे महिलांना कौटुंबिक हिंसाचार सहन करावा लागायचा पण आज पुरुषांप्रमाणे महिलाही व्यसनांच्या आहारी जात आहेत. महिलांच्या व्यसनाधीनतेची पाळ-मुळं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समजूतीत रुजलेली आहेत. महिलांच्या व्यसनाला ग्लॅमर आला आहे. याला सिनेमा जबाबदार आहे. चित्रपटांमधून व्यसनाधीनतेचे चुकीचे समर्थन केले जाते. महिलांमध्ये व्यसनाधीनता इतकी वाढली आहे की, त्यासाठी डॉ. अनिल अवचट आणि डॉ. अनिता अवचट यांना २९ ऑगस्ट १९८६ साली ‛निशिगंधा’ हे फक्त महिलांसाठीचे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावे लागले. मुक्तांगण मध्ये उपचार, जनजागरण व पुनर्वसन या पद्धतीने काम चालते. अगदी अलीकडच्या संशोधनातून असे दिसून येत आहे की, २५% लोक व्यसनाधीन आहेत. पूर्वी गावात एखादा माणूस व्यसनाधीन असायचा, आज गावात एखादा माणूस निर्व्यसनी आहे. व्यसनाधीनतेचे सरासरी वय पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये याची दक्षता घेतलेली बरी. व्यसन म्हटलं की दारू, तंबाखू, सिगरेट हे माहीत होतं पण आजकाल त्याच्याही पुढे जाऊन झोपेच्या गोळ्या, हुक्का, चरस, ब्राऊन शुगर, कोकेन, पेन किलरच्या गोळ्या, पेट्रोल, व्हाईटनर या गोष्टी नशेसाठी वापरल्या जातात. या व्यसनांचे अनेक दुष्परिणाम आहेत. वेगवेगळे आजार, कॅन्सर, हृदयरोग, चव नाहीसे होणे, वासाचे ज्ञान कमी होणे, श्वसनाचे आजार होणे, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे, प्रजनन क्षमता कमी होणे, स्मृतीभंश होणे, रक्तदाबात चढ-उतार होणे, मेंदूच्या पेशी मृत होणे, एकाग्रता कमी होणे, झोप न लागणे, निराशा आणि चिंतेने ग्रासले जाणे, पचन क्षमता कमी होणे, पाठ दुखी इत्यादी आजार होतात. मुलींनो कोणत्याही प्रकारच्या व्यसनाने आनंद मिळत नाही, आनंद मिळण्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे घरच्यांशी बोला, एखादा छंद जोपासा. सुरुवातीला गंमत म्हणून सुरू केलेली एखादी गोष्ट नंतर व्यसन बनते. पालकांनी योग्य वयात मुलांशी योग्य संवाद केला तर मुलांना व्यसन लागत नाही. म्हणून मुलांशी सुसंवाद ठेवा, त्यांना परिणामांची माहिती द्या.”
सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन, मा. श्री राजेंद्र पवार, विश्वस्त-सचिव, मा. सौ. सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश नलावडे, संस्था समन्वयक श्री.प्रशांत तनपुरे, संस्थेच्या एचआर हेड गार्गी मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, उपप्राचार्य, डॉ. मोहन निंबाळकर, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. परिमीता जाधव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग विशेष परिश्रम घेत आहेत. स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे समन्वयक प्रा. राजकुमार देशमुख, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.रोहिदास लोहकरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ. अश्लेषा मुंगी यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. रोहिदास लोहकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
Pune: कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
पुणे: महावितरणला पावसाचा तडाखा; ९२४ खांब जमीनदोस्त
ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ३०५ वीजग्राहकांना मिळाले स्मार्टफोन अन् स्मार्टवॉच