January 18, 2026

पुणेकरांना यंदाही कर दिलासा: मिळकतकर जैसे थे

पुणे, ५ फेब्रुवारी २०२५: महापालिकेकडून २०२५-२६ या आर्थिक वर्षात पुणेकरांना दिलासा देण्यात आला आहे. या वर्षासाठी मिळकतकरात कोणतीही वाढ नसलेला प्रस्ताव महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून स्थायी समितीत ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास महापालिका आयुक्तांंनी मान्यता दिली आहे. त्यामुळे नागरिकांना सलग नवव्या वर्षी कर वाढीतून दिलासा मिळाला आहे.

महापालिकेकडून २०१६ मध्ये शेवटची १० टक्के करवाढ करण्यात आली होती. त्यानंतर, मागील आठ वर्षांपासून कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.तर पुढील वर्षासाठीही करवाढ केलेली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार प्रशासनाकडून २० फेब्रुवारीपूर्वी पुढील आर्थिक वर्षाच्या कर आकारणीबाबत निर्णय घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

मागील तीन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक नियुक्त असल्याने तसेच मुख्यसभा अस्तित्वात नाही. त्यातच करवाढ हा धोरणात्मक निर्णय असल्याने प्रशासकांकडून मिळकतकर जैसे थे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मिळकतकराच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार असला, तरी प्रशासनाकडून नवीन मिळकतींची कर आकारणी, थकबाकी वसुली, मिळकतींचा लिलाव या माध्यमातून उत्पन्नवाढीवर भर देण्याच्या सूचना करत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

थकबाकी वसूलीसाठी वाढीव कर्मचारी

एका बाजूला पुढील वर्षासाठी प्रशासनाने मिळकतकर वाढ केलेली नसली तरी चालू आर्थिक वर्षातील कर उत्पन्नही लक्षणीय प्रमाणात घटले आहे. त्यामुळे कर संकलन विभागास थकबाकी वसूलीसाठी आणखी वाढीव कर्मचारी देण्यात आले आहेत. मागील महिन्यात या विभागासाठी १०० कर्मचारी देण्यात आले होते. तर आता आणखी ५५ कर्मचारी या कामासाठी देण्यात आले आहे. या विभागास २०२४-२५ या वर्षासाठी २७२७ कोटी रूपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. तर आर्थिक वर्ष संपण्यास अवघा दिड महिना राहिलेला असतानाही या विभागाचे उत्पन्नाचा गाडा २ हजार कोटींवर अडकला आहे. त्यामुळे महापालिकेकडून मार्च अखेर पर्यंत जास्तीत जास्त वसूलीसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.