छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली), 22/02/2025: संकल्पना, मनुष्यबळ, कौशल्य, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची निती, योग्य शिक्षण या सगळ्यांची योग्य मोट बांधली तर राज्याची नव्हे तर देशाची अर्थव्यवस्था ट्रिलीयन इकॉनामीपर्यंत नक्की पोहोचेल, असा विश्वास ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केला.
दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिला सत्रात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात महाराष्ट्र टाइम्सचे समूह संपादक पराग करंदीकर, ‘केपीआयटी’चे प्रमुख रवी पंडित, ‘बीव्हीजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड सहभागी झाले होते. त्यांच्याशी पत्रकार, निवेदक प्रसन्न जोशी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण सभामंडपातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व्यासपीठावर या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी पाऊल पडते पुढे याचा अन्वयार्थ काय, त्याचे पडसाद कोणकोणत्या क्षेत्रात पडत आहेत, याविषयी जाणून घेण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सेवा, शिक्षण आणि अन्य उद्योग क्षेत्रात जेव्हा जेव्हा मराठी पाऊल पुढे पडते तेव्हा तेव्हा त्याची दखल साहित्याच्या माध्यमातून घेण्यात येते.
सरस्वतीची उपासना करून लक्ष्मीला प्रसन्न करता येते हे गेल्यावर पन्नास वर्षात मराठी माणसाला उमगले आहे. आता मराठी माणसाला व्यवसाय करणे गैर वाटत नाही. व्यवसायात असलेली ‘रिस्क’ घेण्यासाठी आपली मानसिकता तयार झालेली आहे, असे पराग करंदीकर म्हणाले. दिल्लीत आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या उपयुक्ततेविषयी ते म्हणाले, मराठीचा डंका हा केवळ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील वाजला पाहिजे. भाषा जेव्हा प्रादेशिक बंध ओलांडून पुढे जाते तेव्हा भाषा-संस्कृती अधिक मोठी होते. त्या अर्थाने आपले पाऊल पुढे पडले आहे. गरज नसलेल्या गोष्टींमध्ये अडकून न राहता ताकद आणि बुद्धी लावून जात, धर्म, पंथ, भाषा यांच्या पलीकडे जाणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
हणमंतराव गायकवाड म्हणाले, उद्योग क्षेत्रात भरारी घेताना आपल्या कामात गुणवत्ता राखली पाहिजे. त्यात सर्वोत्कृष्टपणा आणला पाहिजे. कोणत्याही कामाची लाज न बाळगता ते काम सर्वोत्कृष्ट पद्धतीने केले पाहिजे. जगात संधी आहेत; संधींचा शोध घेतला पाहिजे. मराठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वास्को-द-गामासारख्या खलाशाकडून शोधाची गरज आणि धाडस यासाठी प्रेरणा घेणे गरजेचे आहे.
स्टार्टअप इकोसिस्टीम, स्टार्ट अप नेशन या संकल्पनांबाबत माहिती देताना रवी पंडित म्हणाले, कोणतेही काम करताना भावना, महत्त्वाकांक्षा, जिद्द महत्त्वाची ठरते. आपले व्यक्तिमत्व हे आपल्या शब्दांपेक्षा अधिक बोलते.
जीवनात काहीतरी भव्य दिव्य करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. आराम हराम आहे, कष्टाच्या मागे धावले पाहिजे म्हणजे यश मिळतेच, असा संदेशही त्यांनी दिला.
ठळक मुद्दे
जगाची गरज आणि आपली शिक्षण पद्धती यात असलेल्या तफावतीमुळे निर्माण झालेली दरी भरून काढणे गरजेचे आहे.
जगात संधी खूप आहेत; आपल्याला त्या शोधता आल्या पाहिजेत.
मराठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
जिद्दीने कष्ट करण्याची तयारी ठेवावी.
भविष्याचा वेध घेताना, व्यक्तिमत्व घडविण्यासाठी वर्तमानाचे भान ठेवून घटना, घडामोडी, इतिहास या सगळ्यांची शिदोरी सोबत ठेवली पाहिजे.
काम करताना आपला देश पुढे जाईल यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे.
गावे सर्वार्थाने समृद्ध, सक्षम झाली पाहिजेत.
तरुणाईने कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे.
आपली जडणघडण ही संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शूर सेनानी बाजीराव पेशवे यांच्या विचारातून झाली आहे. एकमेकांचे हित, यश लक्षात घेऊन सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे.
देश पुढे नेण्यासाठी विद्यार्थी दशेत मुलांना घडविले पाहिजे.
उद्योजक होण्यासाठी साहित्यातून प्रेरणा मिळते; परंतु त्यासाठी कल्पकता, मनुष्यबळ, कौशल्य आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी ठेवायला हवी.
कार्यक्रमाला भावनिक किनार
बीव्हीजीचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांच्या मातोश्री मराठी भाषेच्या शिक्षिका होत्या. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. असे असतानाही त्यांना आदरांजली म्हणून गायकवाड साहित्य संमेलनात सहभागी झाले.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी