October 14, 2025

महेश पाटीलांसाठी महापालिकेत तयार केले अपर आयुक्त पद

पुणे, २६ फेब्रुवारी २०२५ : महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त पदे मंजूर आहेत. परंतु, गेल्या वर्षभरापासून त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. त्यानंतर आता शासनाकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेले उपायुक्त महेश पाटील यांची अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) पदी बढती दिली असून त्यांची प्रतिनियुक्तीने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाऐवजी महसूल विभागाने काढल्याने तसेच या आदेशात महापालिका अप्पर आयुक्तपद नमूद केल्याने या नियुक्ती बाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात एप्रिल २०२४ मध्ये महापालिकेकडून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि त्यानंतर काही महिन्यांतच दुसरे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर एकमेव अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे सर्व विभागांचा कार्यभार आहे, ज्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येत होता. तर, उर्वरीत दोन पदांचा पदभार महापालिका आयुक्तांकडे असल्याने त्यांच्यावरही कामाचा ताण होता. त्यामुळे, शासनाकडून या पदावर तातडीने अधिकारी नियुक्त करावे, अशी मागणी शहरातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तर, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू झाल्याने पालिकेलाही अतिरिक्त आयुक्त मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, या बदल्यांमध्ये कोणीही अधिकारी महापालिकेसाठी देण्यात आले नव्हते. अखेर, शासनाने मंगळवारी (दि.२५) पाटील यांच्या पदोन्नतीचे आदेश काढत त्यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. पाटील यांच्याकडे सध्या महापालिकेच्या दक्षता विभाग आणि मालमत्ता विभागासह निवडणूक विभागाचा पदभार होता.