October 14, 2025

वाहनांवर ‘एचएसआरपी’बसविण्याकरीता ३० जूनपर्यंत मुदतवाढ

पुणे, २४ मार्च २०२५: राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याकरीता ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

वाहनांवर एचएसआरपी बसविण्याकरीता यापूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे काम अपेक्षि प्रमाणात न झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. एका ठिकाणी किमान २५ किंवा २५ पेक्षा अधिक दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक मालकांनी एचएसआरपी बसविण्याकरीता अर्ज केल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंवा गृहनिर्माण संस्थामध्ये संबंधित एजन्सीमार्फत कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता एचएसआरपी बसविण्यात येईल.

या पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरीता क्षेत्र २ करिता M/s REAL MAZON INDIA LTD या संस्थेची उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. वाहनचालकांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसविण्याकरीता ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या संकेतस्थळावर भेट द्यावी. मोटार सायकल व ट्रॅक्टरकरीता दर ४५० रुपये, तीन चाकी वाहनांकरिता ५०० रुपये आणि सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांकरिता ७४५ रुपये दर आकारला जाणार असून याव्यतिरिक्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही भरावा आहे. शुल्क ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.