October 14, 2025

संभाजीराजे छत्रपती यांची रायगडावरील ‘वाघ्या’ समाधी हटवण्याची मागणी

रायगड, २४ मार्च २०२५: रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या कथित वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या कायमस्वरूपी हटवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी ३१ मेपूर्वी हे ‘अतिक्रमण’ दूर करण्याची विनंती केली आहे, जी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार करण्यात यावी असे सुद्धा त्या पात्रात लिहिले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या मते, इतिहासकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांनी स्पष्ट केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वाघ्या नावाच्या कुत्र्याचा कोणताही ऐतिहासिक संदर्भ किंवा उल्लेख आढळत नाही. तसेच, पुरातत्व विभागाकडे या तथाकथित समाधी किंवा वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिक महत्त्वाचे कोणतेही पुरावे नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र समाधीजवळ अशा काल्पनिक संरचनेचे अस्तित्व असणे हे दुर्दैवी असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले आहे. त्यांनी याला श्रद्धेची चेष्टा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान वारशाला धोका असल्याचे म्हटले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियमांनुसार, १०० वर्षांहून अधिक जुन्या संरचनांनाच संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला जातो. त्यामुळे वाघ्या समाधी १०० वर्षे पूर्ण होण्याआधीच ती हटवण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.