October 14, 2025

पुणे: महापालिका काढणार तलावांमधील गाळ

पुणे, २५ मार्च २०२५: कात्रज, जांभुळवाडी व पाषाण येथील तलावांमधील गाळ काढुन तलवाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर महापालिकेकडुन भर देण्यात येणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जलसंपदा विभागाच्या मदतीने गाळ काढण्यास सुरवात केली जाणार आहे. या कामामुळे जलपर्णीवर नियंत्रण येणार आहे, त्याचबरोबर तलावाभोवतीच्या परिसरातील नागरीकांची डासांच्या प्रादूर्भावापासुन सुटका होणार आहे.

कात्रज, जांभुळवाडी व पाषाण हे तिन्ही तलाव शहराच्या जवळील तलाव आहेत. संबंधित तलावामधील गाळ काढण्याकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची साठवण क्षमता कमी होत आहे. त्याचबरोबर जलपर्णीच्या वाढत्या प्रभावामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढून नागरीकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाकडुन तिन्ही तलावांमधील गाळ काढण्याबाबत निश्‍चित करण्यात आले होते. महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या मलनिस्सारण विभाग व जलसंपदाच्या यांत्रीकी विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यामुळे तलावांमधील गाळ काढण्याचे काम जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडुन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तलावांमधील गाळ काढण्यासाठी महापालिकेकडुन संबंधित विभागाला कार्यादेश देण्यात आला आहे. तिन्ही तलावांमधील गाळ काढण्यासाठी चार कोटी रूपयांहून अधिक निधी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने एक कोटी रूपयांची आगाऊ रक्कम यांत्रिकी विभागाला दिली आहे. संबंधित विभागाकडे या कामासाठी आवश्‍यक यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व कामाचा अनुभव असल्याने महापालिकेने संबंधित शासकीय विभागाकडेच हे काम दिले आहे. १ एप्रिलपासुन हे काम केले जाणार आहे. प्रारंभी जांभुळवाडी येथील तलाव व राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कात्रज तलावातील गाळ काढला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम केले जाणार आहे. त्यानंतर, पाषाण तलावाचे काम केले जाणार असल्याची माहिती मलनिस्सारण विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष तांदळे यांनी दिली.
“कात्रज, जांभुळवाडी व पाषाण येथील तलावातील गाळ काढला जाणार आहे. जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडे हे काम देण्यात आलेले आहे. या कामासाठी त्यांना आगाऊ रक्कमही दिली आहे, असे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

शेतीसाठी गाळ
तलावांमधील काढलेला गाळ शेतीसाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे महापालिकेने तलावातुन काढलेल्या गाळ शेतीसाठी देण्याचे निश्‍चित केले आहे. शेतकऱ्यांनी महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाशी संपर्क साधुन गाळ घेऊन जाण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तांदळे यांनी केले आहे.