October 14, 2025

शालेय विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित करण्याच्या विचारार्थ पुण्यात कार्यशाळेचे आयोजन

पुणे,२९/०३/२०२५:‘शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास’ या विषयावरील एका कार्यशाळेचे आयोजन दिनांक 29 मार्च 2025ला परिसर आणि पर्यावरण शिक्षण केंद्र (CEE) या संस्थांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात केले. पुण्यातील शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक, पालक आणि महापालिकेतील अधिकारी या कार्यशाळेत सहभागी झाले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात पुणे महानगरपालिकेने 2023 मध्ये आखलेल्या ‘शालेय प्रवास सुधारणा कार्यक्रमाची (School Travel Improvement Program – STIP) ओळख करून देण्यात आली. खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि बिगर स्वयंचलित साधनांच्या वापराला चालना मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. यादृष्टीने काही प्रयत्न होत असले तरीही अद्याप आपल्या शहरात शालेय प्रवास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पुरेशा पायाभूत सेवासुविधा उपलब्ध नाहीत. पदपथावरील अतिक्रमणे, सायकल-मार्गांची कमतरता, शालेय परिसरात अनियंत्रितरित्या होत असलेली वाहतूक, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अपुऱ्या वा अयोग्य सुविधा आणि शाळेपर्यंत पोहोचणाऱ्या वाहतूक साधनांचा अभाव – यांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवास अत्यंत जोखमीचा होत आहे, ही काळजीची बाब आहे. केवळ वरवरच्या उपायांनी ही समस्या सुटणार नसून मूलभूत मुद्द्यांची सोडवणूक करण्याची गरज आहे.

ह्या वर्षीच्या पुणे महानगरपालिकेच्या बजेट मध्ये, STIP साठी ५० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. “शालेय प्रवास सुधारणा कार्यक्रमासाठी वित्तीय तरतूद करण्यात आलेली आहे ही अत्यंत सकारात्मक बाब असून त्याचा विनियोग चांगले पादचारी मार्ग, सुरक्षित जंक्शन, सावलीचे रस्ते, सायकल मार्ग अशा नागरी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी व सुधारण्यासाठी होणेही अत्यावश्यक आहे. पायाभूत सेवासुविधा जेव्हा टिकाऊ, सुरक्षित आणि सहज उपलब्ध असतात तेव्हा त्यांचा खात्रीशीर वापर होतो. म्हणूनच अशा मजबूत सेवासुविधा उभारून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि स्वास्थ्य जपले पाहिजे,” असे मत नगर रचनाकार अभिजित कोंढाळकर यांनी मांडले.

STIP कार्यक्रमाची अधिकाधिक शाळांमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी करावी, असे कार्यशाळेतील सहभागींच्या सह्यांचे पत्र पुणे महानगरपालिकेला सादर करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गतिशीलता विभागाचे शहर अभियंता बापू गायकवाड यांनी कार्यशाळेला उपस्थिती लावली आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुरक्षित शाळा कार्यक्रम राबविण्याचा त्यांचा अनुभव सांगितला. पुणे महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना सायकलचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या ‘सायकल बस’ या अभिनव संकल्पनेवर आधारित तीन वक्त्यांची मांडणी झाली.पॅनेलच्या सदस्यांमध्ये अहमदाबाद येथील MyByk चे संस्थापक आणि संचालक अरिजित सोनी, त्रिवेंद्रम येथील सायकल महापौर प्रकाश पी. गोपीनाथ आणि पुण्यातील सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंटचे हर्षद अभ्यंकर यांचा समावेश होता.  भारतातील विविध शहरात ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात या तिन्ही वक्त्यांचे योगदान राहिले आहे. असे करताना कोणती आव्हाने आली आणि ती त्यावर त्यांनी कशी मात केली हे त्यांनी सांगितले.

“सायकल चालवायला मजा येते म्हणून सायकल चालवली पाहिजे, हे अशाप्रकारे दाखवले तरच पालक आणि इतर लोक सायकल बस सारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होतील.” – अरिजित सोनी,MyByk

फरासखाना पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी कार्यशाळेला उपस्थिती लावली आणि मुलांसाठी तसेच इतरांसाठी रस्ते सुरक्षित करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

शेवटच्या सत्रात उपस्थित शाळांनी त्यांच्या समस्या सांगितल्या व त्या सोडविण्याकरिता काय करावे लागेल, कोणाला सहभागी व्हावं लागेल यावर चर्चा केली. या समस्यांचा विस्तृत पाठपुरावा येत्या काळात करण्यात येईल.