राजेश घोडके
पुणे, ३०/०३/२०२५ : गुढीपाडवा हा महाराष्ट्रासह इतर ही राज्यात साजरा होणारा एक महत्त्वाचा सण आहे. तो हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून, चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. या दिवशी शालिवाहन शक संवत्सराची सुरुवात होते.
महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्याला शुभ मुहूर्त मानला जातो, त्यामुळे या दिवशी गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, सुवर्ण खरेदी यासारखे शुभ कार्य हमखास केले जातात.
गुढीपाडव्याच्या सणानिमित्त घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यासाठी बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, फुलांचा हार आणि कडुलिंबाची पाने बांधली जातात. गुढीच्या टोकाला चांदी किंवा तांब्याचे कलश ठेवले जाते.
पाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात, घरा समोर रांगोळी काढतात आणि पक्वान्नांचा आस्वाद घेतात. पुरणपोळी, श्रीखंड-पुरी , खीर यांसारखे पारंपरिक गोड खाद्यपदार्थ बनवले जातात. या दिवशी कडुलिंबाची पाने व गूळ मिश्रण खाण्याची प्रथा आहे. कडुलिंबाचे सेवन केल्याने आरोग्यदायी फायदे मिळतात, कडुलिंबाचा स्वाद कडसर असला तरी त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते.
नंदा जगताप (गृहिणी) सातारा, सांगतात की, “गुढीपाडव्याला आम्ही सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करून आंब्याचा पानाचे आणि झेंडू च्या फुलाचे तोरण बनवतो. अंगणात रांगोळी काढतो आणि दारासमोर गुढी उभारतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आनंद साजरा करतो.”
अमोल म्हात्रे (व्यवसायिक) पुणे म्हणतात की, “आमच्याकडे गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. आम्ही या दिवशी सह कुटुंब देवपूजा करतो तसेच कुटुंबासोबत श्रीखंड-पोळीचा स्वाद घेतो. नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावो, अशी प्रार्थना ही करतो.” या श्रद्धेच्या भावनेने अमोल बोलत होते,
वैभव देशमुख (विद्यार्थी) अ.नगर म्हणतो की, “गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही सोसायटीमध्ये एकत्र येऊन विविध कार्यक्रम ठेवतो. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतो. हा दिवस आम्हा सगळ्यांसाठी खूप उत्साहाचा असतो, आम्ही सगळी मुले खूप मजा करतो.”
दीक्षा पाटील (ज्येष्ठ नागरिक) पुणे सांगतात की, “आमच्या लहानपणी गुढी उभारल्यावर आम्ही कडुलिंबाचे पान गूळ किंवा साखर एकत्र करून खात असू , आजही आम्ही ती परंपरा जपत आहोत आणि तितक्याच थाटामाटाने साजरी करतो.”
गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने झालेली दिसते. नवे वर्ष आणि नवी उमेद या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी