राजेश घोडके
पुणे, ०२/०४/२०२५: बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत तयार झालेली द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात पुढील पाच दिवस ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात वादळी वारे, मेघगर्जना आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः १ ते ३ एप्रिल या दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांत गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात, वातावरणातील उष्णतेमुळे उंच ढगांची निर्मिती होते. हे ढग जसजसे उंचीवर जातात, तसतसे त्यांच्या सभोवतालचे तापमान शून्याच्या खाली जाते. या कमी तापमानामुळे ढगांमधील पाणी गोठते आणि लहान-लहान हिमकणांमध्ये रूपांतरित होते. हे हिमकण अत्यंत हलके असल्यामुळे ते लगेच खाली न पडता, ढगांमध्येच तरंगत राहतात.
ढगांमधील अंतर्गत हवेच्या प्रवाहामुळे हे हिमकण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरतात. या हालचालीदरम्यान, हे हिमकण एकमेकांना चिकटतात आणि त्यांचे आकारमान वाढत जाते. अशा प्रकारे, लहान हिमकणांपासून मोठ्या गारा तयार होतात. जेव्हा ढग या गारांचे वजन पेलण्यास असमर्थ ठरतात, तेव्हा गारपीट होते.
राज्यातील हवामानाचा अंदाज,विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडेल. राज्यात सध्या कमाल तापमान ३६° ते ४१° सेल्सिअसच्या दरम्यान आहे. वातावरणातील वाढलेली आर्द्रता आणि तापमानामुळे उंच ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागरिकांना हवामानातील बदलांची माहिती घेत राहण्याचा आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
More Stories
Pune: महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार
Pune: बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा मार्ग झाला मोकळा
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा