October 15, 2025

तनिषा भिसे मृत्‍यू प्रकरणात आता ससूनमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची बैठक, अंतिम अहवालासाठी कागदपत्रांची तपासणी

पुणे, १५ एप्रिल २०२५ः गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ईश्वरी (उर्फ तनिषा) भिसे प्रकरणातील अंतिम अहवाल तयार करण्यासाठी काहीसा वेळ लागणार असून याबाबत ससूनमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची बैठक मंगळवारी (ता. १५) होणार आहे. दरम्यान या प्रकरणातील संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केली जाणार असून समितीचा अंतिम अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात येणार असल्याची माहिती ससूनचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव यांनी दिली आहे.

वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूसाठी दीनानाथ रुग्णालय अडचणीत आले आहे. या संदर्भात विविध समितींनी चौशी करत आपला अहवाल सादर केला होता. दरम्यान आता या प्रकरणात वद्यकीय तज्ज्ञांची समिती अंतिम अहवाल सादर करणार आहे. ही समिती तनिषा भिसे यांच्या मृत्यूची जबाबदारी नेमकी कोणाची यावर बैठकीत चर्चा करणार आहे. तसेच समितीच्‍या निष्‍कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडे सुपूर्त केला जाऊन त्‍यानुसार पुढील कारवाईची केली जाणार आहे.

भिसे यांच्या नातेवाइकांनी त्‍याबाबत अलंकार पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी त्‍यांचे जबाब नोंदवले आहेत. अलंकार पोलिसांनी भिसे कुटुंबीयांसह दीनानाथ रुग्णालय, इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी, मणिपाल रुग्णालय व सूर्या रुग्णालय येथील सर्व संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. तसेच रुग्णालयाचील सीसीटीव्ही फुटेज, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे जबाब आदींची नोंद देखील पोलिसांनी केली आहे. दरम्यान ही संपूर्ण माहिती ससून रुग्णालयातील समितीला सुपूर्द करण्यात आली असून या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे की नाही, याबाबत समिती पाहणी करणार आहे.

याबाबत डॉ. यल्लाप्पा जाधव यांनी सांगितले की, “तनिषा भिसे प्रकरणातील सर्व संकलित माहिती व अहवाल आमच्याकडे अलंकार पोलिसांद्वारे देण्यात आले आहे. त्यावर समिती स्थापन झाली असून यामध्ये तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यांच्‍यासह, स्त्रीरोग विभागप्रमुख, औषधशास्त्र विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख, भूलशास्त्र विभागप्रमुख, बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख अशा सहा जणांचा समावेश आहे. समितीची बैठक होईल व त्यात तनिषा भिसे प्रकरणातील सर्व कागदपत्रे समितीच्या तज्ज्ञांद्वारे तपासली जाणार आहेत. आवश्यक असल्यास इतर काही कागदपत्रे देखील मागवण्यात येतील. शासनाच्या आदेशानुसार या प्रकरणात हलगर्जीपणा झाला की नाही याचा तपास समिती करेल.”

दरम्यान तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील समितींच्या अभ्सायात तीन ते चार रुग्णालयांचा समावेश असून त्या सर्व रुग्णालयांबाबत सविस्तर माहिती या अहवालांमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण माहितीचा अभ्यास करण्यासाठी विशेषतः प्रत्येक विषयातील तज्ञ याचा अभ्यास करतील व त्यानुसार अंतिम अहवाल तयार केला जाईल. त्यामुळे अंतिम अहवाल सादर करण्यात काहीसा वेळ लागेल, असे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.

तनिषा भिसे मृत्‍यू प्रकरणात या आधी तीन समित्यांनी चौकशी केली असून त्यात आरोग्य विभागाची समिती, धर्मादाय सहआयुक्त समिती व मातामृत्यू अन्वेषण समितीचा समावेश आहे. या तिन्ही समित्यांचे अहवाल शासनाला सादर करण्यात आले असताना आता ससूनच्‍या समितीचा अहवाल देखील महत्त्वाचा असेल.