October 16, 2025

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत १२३ तक्रारींवर कार्यवाही-अध्यक्षा रूपाली चाकणकर

पुणे, १५ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमांतर्गत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सुनावणीत पुणे शहरातील कौटुंबिक छळ, मालमत्ता आदी प्राप्त एकूण १२३ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.

आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आज पासून तीन दिवस पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत १६ एप्रिल रोजी पुणे ग्रामीणकरिता जिल्हाधिकारी कार्यालय आणि १७ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड येथे जनसुनावणी होणार आहे.

श्रीमती चाकणकर यांनी आज पुणे शहर विभागासाठी जनसुनावणी घेतली. महिलांना मुंबई येथील आयोगाच्या कार्यालयात येण्याची गरज भासू नये, त्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून सर्व संबंधित यंत्रणेसोबत जिल्हास्तरावर सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी एकाच छताखाली पोलिस, प्रशासन उपस्थित असल्याने महिलांच्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे.

श्रीमती चाकणकर यांनी जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांबाबत आढावा घेतला. यावेळी पोलिस, प्रशासन, महिला व बालविकास, कामगार, परिवहन, शिक्षण, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विभागांचे सादरीकरण केले.

जनसुनावणी आणि आढावा बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस उपस्थित होते.

स्व.तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालयासाठी मार्गदर्शक तत्वे असावीत अशी आयोगाची भूमिका होती. त्याबाबत उपसंचालक आरोग्य डॉ राधाकिसन पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एकनाथ पवार यांनी आपला अहवाल आयोगास सादर केला. श्रीमती रूपाली चाकणकर यांनी, जनसुनावणी आणि आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना एसओपीबाबत माहिती दिली.

You may have missed