January 16, 2026

शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही

मुंबई/पुणे, १५ जानेवारी २०२६: बोटावर लावलेल्या शाईला पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे हे गंभीर गैरकृत्य मानले जाते. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आली, तर त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

मतदाराने मतदान केल्यानंतर त्याची नोंद घेतली जाते, त्यामुळे फक्त शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येणार नाही. याबाबतची दक्षता आणि सतर्कता यापूर्वीच सर्व संबंधितांना सुचवण्यात आलेली आहे.

मतदाराच्या बोटावर शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या बोटावर ठळकपणे शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जातो. शाई बोटावर नीट टिकावी, यासाठी नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला तीन-चार वेळा घासून शाई लावण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत, जे मार्कर पेनवरही नमूद केलेले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना आणि प्रशासनाला पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, शाई पुसण्याचा प्रयत्न करून कोणतेही गैरकृत्य करू नये.