May 14, 2024

कोंढवा भागात मुलींसाठी उर्दू माध्यमिक शाळा सुरू करण्याची आप ची मागणी

पुणे, ०६/१२/२०२३: कोंढवा भागामध्ये पाच किलोमीटर परिसरात आठवी पुढे शिकण्यासाठी उर्दू शाळा नसल्यामुळे नववी दहावीसाठी वर्ग सुरू करावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने मनपा उपयुक्त नंदकर यांच्याकडे केली आहे.

कोंढवा भागात संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा, अब्दुल कलाम आझाद शाळा, बापूसाहेब दरेकर शाळा असून या तिन्ही शाळांमध्ये मिळून पटसंख्या २०० पेक्षा जास्त आहे. या तिन्ही शाळांमध्ये आठवीपर्यंतच उर्दू शिक्षण उपलब्ध आहे. आठवी नंतर पाच- सहा किलोमीटर परिसरात पुढील शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध नाही आणि खाजगी शाळा परवडत नसल्यामुळे बहुतांश मुली शिक्षण अर्धवट सोडत आहेत. पालक मुलींना दूरच्या शाळेत पाठवण्यास तयार नाहीत, त्यामुळे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण वाढत आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे स्वस्तात आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्यामुळे शासन महानगरपालिकेचे असलेल्या शाळेमध्येच नववी दहावीचे मुलामुलींचे वर्ग उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भेटून आयुक्तांकडे केली. मौलाना अब्दुल कलाम शाळेमध्ये पटसंख्या चांगली आहे, परंतु तिथे पुरेसे बेंचेस नाहीत तसेच दिव्यांगांसाठी टॉयलेट उपलब्ध नाही. त्यामुळे या मागण्या सुद्धा या शिष्टमंडळाने केल्या. पुढील शैक्षणिक वर्षात वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन उपायुक्तांनी दिले.

यावेळेस आमदनी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष एम अली सय्यद ,हरून अन्सारी, मुक्ती अहमद हुसेन कासमी, नौशाद अन्सारी, मिलिंद सरोदे, नितीन पायगुडे, शंकर थोरात, खुशबू अन्सारी, विक्रम गायकवाड, ऋषिकेश मारणे इत्यादी उपस्थित होते.