January 16, 2026

अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला

पुणे, १५ जानेवारी २०२६: तब्बल नऊ वर्षानंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकांचा सूर लागला असून आज शहरभर मतदान सुरू आहे. सकाळपासून पुणेकरांमध्ये उत्साह पाहायला मिळत असला, तरी काही ठिकाणी मतदान मशीन बंद पडल्याने गोंधळही दिसून आला.

अभिनेता सुबोध भावे यांनी सहकुटुंब पुणे प्रार्थना समाज येथे मतदान करून नागरिकांना मतदान करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. भावे म्हणाले, “मतदानाची टक्केवारी घसरली ही खरी गोष्ट आहे, पण आपल्याला घटनेने दिलेला मूलभूत अधिकार — मतदान — आपण पाळला पाहिजे. आपलं कर्तव्य बजावल्याशिवाय बाहेर बसणे योग्य नाही.”

त्यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन करत पुढे सांगितले, “ज्या उमेदवारांना आपण निवडून देतो त्यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांचे काम पाहणे हे देखील नागरिकांचे कर्तव्य आहे. नगरसेवकांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत असे मानून नागरिकांनी आपला हक्क गमावू नये.”

सुबोध भावे म्हणाले की, “पुणे शहराचा बदललेला चेहरा मुंबईपेक्षा भयंकर होत चालला आहे. 3 मजली इमारतीच्या जागी 27 मजली इमारती उभारल्यामुळे शहरातील जीवनमान प्रभावित झाले आहे. मुलांना खेळायला मैदान नाही, जेष्ठ नागरिकांना फिरायला जागा नाही. विकासाचा अर्थ फक्त इमारती उभारणे नसून, माणसांसाठी आणि जीवनासाठी जागा निर्माण करणे असावे.”

भावे यांनी पुढे नागरिकांना संघटित होऊन दबाव गट तयार करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “फुकट द्यायचा असेल तर मैदान द्या, बाकी काही नको. नागरिकांचे जीवन सुसह्य होणे हे पहिलं काम आहे. मेट्रो, इमारती, सुविधांपेक्षा श्वास घेण्याची जागा महत्त्वाची आहे.”

अभिनेता सुबोध भावे यांनी आपला अनुभव शेअर करत सांगितले की, “अठरा वर्षांपासून मी कधीही मतदानाचा हक्क सोडला नाही. हा राष्ट्रीय आणि मूलभूत हक्क आहे, जो प्रत्येक नागरिकाने बजावला पाहिजे.”