पुणे, २० जानेवारी २०२६ : पुण्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’च्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी पुणे शहरातील सर्व सरकारी व खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलाचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी ही माहिती दिली.
२३ जानेवारी रोजी ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’चा चौथा टप्पा (स्टेज-४) पुणे शहरातील मध्यवर्ती, पश्चिम आणि दक्षिण भागातून जाणार असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक निर्बंध आणि मार्ग वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वाहतूक मर्यादित करण्यात येणार आहे. स्पर्धा मार्गावरील रस्ते टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार असून, एकाच रस्त्याचा बंद कालावधी ३० मिनिटांपेक्षा जास्त नसेल. मात्र वारंवार वाहतूक थांबवावी लागणार असल्याने वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राधा चौक, बाणेर रोड, पाऊड रोड, कर्वे रोड, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, टिळक रोड, मार्केट यार्ड, कॅम्प आणि कोंढवा परिसरात विशेष वाहतूक नियंत्रण लागू राहणार आहे. या काळात पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी शक्यतो प्रभावित भाग टाळावेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे तसेच पुणे पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आणि bpgt2026.punepolice.gov.in या संकेतस्थळावरून प्रत्यक्ष वेळेतील वाहतूक अपडेट्स पाहण्याचे आवाहन केले आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अन्य आपत्कालीन सेवा वाहनांना सर्व मार्गांवरून जाण्याची मुभा देण्यात येणार आहे.
‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’च्या चौथ्या टप्प्यात देश-विदेशातील नामांकित सायकलपटू सहभागी होणार असून, अंतिम पुणे टप्प्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहर जागतिक क्रीडा नकाशावर ठळकपणे अधोरेखित होत असल्याची भावना प्रशासन आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

More Stories
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय