July 24, 2024

पुणे: ७ मार्च रोजी होलिका दहन करण्याचे आवाहन

पुणे, दि. २ मार्च, २०२३ : महाराष्ट्रातील अनेक पंचांगांमध्ये येत्या सोमवार दि. ६ मार्च रोजी होलिका दहन दाखविण्यात आले आहे. मात्र या दिवशी भद्रेवर पौर्णिमा येत असल्याने भद्रेचा कालावधी संपल्यानंतर मंगळवार दि. ७ मार्च रोजी नागरिकांनी होलिका दहन करावे असे आवाहन पंचांग बृहस्पती उपाधीने विभूषित पुण्यातील पंचांगकर्ते व खगोलशास्त्राचे अभ्यासक गौरव देशपांडे यांनी केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना देशपांडे म्हणाले, “भविष्यपुराणातील कथेप्रमाणे लहान मुलांच्या रक्षणासाठी आपल्याकडे होलिका दहन करण्याची प्रथा आहे. याबरोबरच आपल्याकडे योग्य काळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे होलिका दहन योग्य दिवशी व्हावे यासाठी नागरिकांनी ६ नव्हे तर ७ मार्च रोजी होलिका दहन करावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत. ६ मार्च रोजी तिथीचा अर्था भाग असलेला करण आणि त्याचा एक भाग असलेला भद्रा येत आहे. भद्रा ही दर महिन्याच्या पौर्णिमेला येते मात्र पुराणात रक्षाबंधन व होलिका दहन या दोन पौर्णिमा भद्रेवर साजऱ्या करू नयेत, असे सांगण्यात आले आहे. जर तसे झाल्यास आपत्ती येण्याची शक्यता असते. हेच लक्षात घेत भद्रेचा कालावधी संपल्यानंतर नागरिकांनी ७ मार्च रोजी होलिका दहन करावे असे आमचे आवाहन आहे.’

शिवाय होलिका दहन करताना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा यासाठी पेट्रोलचा वापर न करता तिळाचे तेल व गाईच्या दुधापासून बनविलेले तूप यांचा वापर करीत अग्नी प्रज्वलित करावा असेही देशपांडे यांनी नमूद केले.