July 27, 2024

निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपातीबाबतचा विकल्प भरून देण्याचे आवाहन

पुणे, 03 मे 2023: निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपात जुन्या कर प्रणालीनुसार करावयाची असल्यास याबाबतचा विकल्प २५ मे २०२३ पर्यंत सादर करावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी पुणे यांनी केले आहे.

शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या पुणे शहर व जिल्ह्यातील वार्षिक निवृत्तीवेतन रुपये ७ लाख ५० हजार पेक्षा जास्त असलेल्या सर्व आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातून आयकर नियमान्वये दरवर्षी व दरमहा आयकर कपात करण्यात येते. सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षापासून आयकर विभागाकडून आयकर नियमात बदल झाले असून दोन पद्धतीने आयकर कपात करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. वित्तीय वर्ष २०२३-२४ मध्ये जुनी कर प्रणाली स्वीकारण्यामध्ये आयकर स्लॅबमध्ये बदल झाले असून जर जुन्या कर प्रणाली नुसार आयकर गणना करावयाची असल्यास निवृत्तीवेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय, पुणे येथे विकल्प भरून देणे आवश्यक आहे.

आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांना आपला आयकर कपात जुन्या कर प्रणालीनुसार करावयाचा असल्यास याबाबतचा विकल्प २५ मे पर्यंत सादर करावा. विहित मुदतीत विकल्प सादर न केल्यास त्याचा २०२३-२०२४ करीता नवीन कर प्रणालीनुसार आयकर कपात करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे कोषागार कार्यालय पुणेतर्फे कळविण्यात आले आहे.