पुणे, दि. १ डिसेंबर, २०२५ : युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर यांचे सुमधुर वादन, देवेश मिरचंदानी यांनी केलेली विलोभनीय कथकप्रस्तुती, रचना बोडस, अतुल खांडेकर, पं. विनायक तोरवी आणि पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांचे सुश्राव्य गायन यांमुळे यावर्षीचा सूर महती महोत्सव उल्लेखनीय ठरला.
ख्यातनाम गायिका, संगीतकार डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक अतुल खांडेकर यांच्या सूर महती फाउंडेशनच्या वतीने सूर महती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा महोत्सव संपन्न झाला. ज्येष्ठ गायक पं विनायक तोरवी, पं अजय पोहनकर यांसोबतच महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक इंदिरा विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार चेतन वाकलकर, डॉ हरी सहस्त्रबुद्धे, सूर महती फाऊंडेशनचे रवींद्र व मानसी खांडेकर, अतुल व भक्ती खांडेकर आदी यावेळी उपस्थित होते. इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या लिबरल आर्ट्स च्या विद्यार्थ्यांनी दोन्ही दिवशी आपल्या गायन सादरीकरणाने महोत्सवाला सुरुवात केली.
डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचा मी भक्त असून त्यांच्या नावाने सुरू असलेल्या या महोत्सवात मला सादरीकरण करण्याची मिळालेली संधी मी महत्त्वाची मानतो असे सांगत डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचा राग तिलक कामोद ऐकत मी तो राग शिकलो म्हणून आज तोच सादर करीत आहे असे प्रसिद्ध व्हायोलिन वादक, गुरु पं. मिलिंद रायकर यांचे शिष्य व सुपुत्र, युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर म्हणाले. यानंतर त्यांनी राग तिलक कामोद ची बहारदार प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी झपतालमधील पारंपरिक बंदिश ‘तीरथ को…’ आणि डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचा तराना सादर केला. यानंतर गुरु डी. के. दातार यांची एक तालातील गत त्यांनी प्रस्तुत केली. स्वरचित मिश्र काफी रागातील रचनेने त्यांनी समारोप केला. रायकर यांना तबल्यावर भरत कामत यांनी समर्पक साथसंगत केली. पार्थ देशमुख व पार्थ कुलकर्णी यांनी तानपुरासाथ केली.
महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात पं. काशिनाथ बोडस आणि डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या शिष्या असलेल्या अमेरिकास्थित रचना बोडस यांचे शास्त्रीय गायन संपन्न झाले. त्यांनी यावेळी राग वाचस्पती सादर केला. यामध्ये त्यांनी ‘साचो तेरे नाम…’ ही विलंबित एकतालमधील पारंपरिक रचना आणि ‘चतुर सुघर बलमा…’ ही मध्यलय अध्दा तीन तालातील रचना सादर केली. त्यानंतर त्यांनी द्रुत तीन तालातील तराना गायला. राग दुर्गामध्ये ‘अंबे दुर्गे…’ ही तीन तालातील रचना आणि द्रुत तीन तालातील तरानाही त्यांनी प्रस्तुत केला. रचना बोडस यांना प्रणव गुरव (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), सायली कुलकर्णी व चिन्मयी ओक (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
यानंतर पहिल्या दिवसाचा समारोप ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विनायक तोरवी यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे या उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि देशातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक होत्या अशा शब्दांत ज्येष्ठ गायक पंडित विनायक तोरवी यांनी त्यांची आठवण काढली. यानंतर त्यांनी राग छायानटची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी ‘अब गुंद लाओ रे माननियां…’ ही पारंपरिक रचना सादर केली. यानंतर त्यांनी ‘पल पल सोच विचार करुं मैं…’ ही बंदिश गायली. यानंतर त्यांनी ‘घर जाने दे अब मोरे मन बसियां…’ ही रचना प्रस्तुत केली. ‘चिदंबर राया ब्रह्माण्ड नायका…’ आणि ‘देव माझा, मी देवाचा…’ या अभंगांच्या सादरीकरणाने त्यांनी गायनाचा समारोप केला. पंडित विनायक तोरवी यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), दत्तात्रय वेलणकर, धनंजय हेगडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य अतुल खांडेकर यांचे कसदार शास्त्रीय गायणाने महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. अतुल खांडेकर यांनी राग भीमपलासचे बहारदार सादरीकरण करीत गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी ‘रे बिरहा बामना…’ हा ख्याल आणि ‘पिया पास ले जा…’ ही बंदिश गायली. यानंतर त्यांनी तराणा सादर केला. उत्तरार्धात त्यांनी राग हेमंतची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी ‘हमरी सुध ली जे मुरारी…’ आणि ‘तन मन धन कर अर्पण गुरू चरण मैं…’ या दोन बंदिशी गायल्या. पद्मश्री जयमाला शिलेदार यांना जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वाहत अतुल खांडेकर यांनी ‘माई मैने गोविंद लिनो मोल…’ हे नाट्यपद सादर करीत आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. अतुल खांडेकर यांना प्रणव गुरव (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), भक्ती खांडेकर व श्रीज दाणी (तानपुरा) यांनी साथ संगत केली.
यानंतर देवेश मिरचंदानी यांनी कथक नृत्य प्रस्तुतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक बंदिशीतील शंकर स्तवनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी नाशिकच्या प्रख्यात गुरु विद्याहरी देशपांडे यांची ‘शंकर गिरिजापती महादेव…’ ही रचना सादर केली. यानंतर त्यांनी ताल पंचम सवारीमध्ये काही रचनांची प्रस्तुती केली. या सर्व रचना देवेश यांनी २०१८ साली स्वतः पंडित बिरजू महाराज यांच्याकडून शिकल्या असल्याची आठवण त्यांनी सांगितली. गझल आणि सरगम यांवरील सादरीकरणाने त्यांनी समारोप केला. देवेश यांना शुभम खंडाळकर (गायन व संवादिनी), कौशिक केळकर (तबला), सुनील अवचट (बासरी), अनिरुद्ध जोशी (सतार) आणि श्रुती पत्की (पढंत) यांनी साथसंगत केली. यानंतर सदर वर्ष हे गुरू पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष असून यानिमित्त त्यांना वंदन करणारा, सूर महती फाउंडेशन निर्मित ‘पारिजात फुलला’ हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला.
जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने तिसऱ्या सूर महती महोत्सवाची सुरेल सांगता झाली. त्यांनी यावेळी राग मारू बिहाग गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये त्यांनी पै गुरुजींची ‘आज सुहाग की रात..’ ही विलंबित बंदिश गायली. डॉ वीणा सहस्त्रबुद्धे आणि आडा चौतालची आठवण सांगत डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांना आदरांजली म्हणून डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांनी आडा चौताल मधील ‘बजाओ रे…’ ही बंदिश प्रस्तुत केली. यानंतर राग चंद्रकंस मध्ये मध्यलय रूपक तालात ‘सखी मुखचंद्र…’ आणि द्रुत तीन तालात ‘आज भैलवा मिलन पी संग…’ या बंदिशी सादर करीत गायनाचा समारोप केला. डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) , ऋतुजा लाड व स्वराली जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेल्या भैरवीची ध्वनीचित्रफीत ऐकत तिसऱ्या सूर महती महोत्सवाचा समारोप झाला. स्वानंद पटवर्धन यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले. महोत्सवासाठी इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, एसबीआय, विलास जावडेकर डेव्हलपर्स, सुमा, एल आय सी यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले होते.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही