पुणे, १९ जानेवारी २०२६: आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या सायकल स्पर्धेच्या प्रोलॉग रेसने आज स्पर्धेच्या भव्यतेची आणि जागतिक दर्जाची झलक पुणेकरांसमोर उघड केली. जगभरातील ३५ देशांतील २८ संघांतील १६४ आंतरराष्ट्रीय सायकलपटू सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवरून सुमारे ४३७ किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास करून विजेतेपदासाठी स्पर्धा करणार आहेत.
आज ७.५ किलोमीटरची प्रोलॉग (टाइम ट्रायल) रेस दुपारी १:३० वाजता शहरातील गोपाळकृष्ण गोखले चौकातून सुरू झाली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्या स्पर्धकाला हिरवा झेंडा दाखवत अधिकृत सुरुवात केली. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राज्य क्रीडा व युवक कल्याण आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
प्रोलॉग रेसमध्ये प्रत्येक सायकलपटू वैयक्तिक स्वरूपात मिनिटांच्या अंतरावर सुरू झाला, त्यामुळे वैयक्तिक वेळ निर्णायक ठरली. शहरातील नागरिकांनी मध्यवर्ती रस्त्यांवरून जाणाऱ्या सायकलपटूंना उत्साहात स्वागत केले.
स्पर्धेच्या पुढील टप्प्यांमध्ये आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशनिया खंडातील खेळाडू सहभागी आहेत. भारताचे इंडियन डेव्हलपमेंट संघही या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी आहे. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मार्गावर सुमारे १५०० पोलिस तैनात होते. वाहतूक नियोजन, तांत्रिक सहाय्य, वैद्यकीय सेवा आणि रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
मुख्य आकर्षण –
१.ढोल-ताशांचा गजर आणि शिवगर्जना: गोपाळकृष्ण गोखले चौक परिसर ढोल-ताश्यांच्या गजराने दुमदुमला. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषांनी वातावरण उत्साही झाले.
२.सायकलपटूंना उत्साहवर्धन: पुणेकरांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खेळाडूंना चिअर अप केले, त्यांचे नाव घेत टाळ्या वाजवल्या आणि सेल्फी घेण्यासाठी उत्साह दाखवला.
३.मस्कॉटचा मोह: स्पर्धेचा रंग वाढवणारा ‘मस्कॉट’ उपस्थितांचे लक्ष वेधून घेतला, नागरिकांनी त्यासोबत सेल्फी घेऊन आनंद व्यक्त केला.
या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे शहर जागतिक क्रीडा नकाशावर अधिक ठळकपणे उभे राहणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या कटिबद्ध प्रयत्नांमुळे स्पर्धेचे यशस्वी आयोजन शक्य झाले असून, पुणेकरांच्या उत्साहाने आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मंगळवार, २० जानेवारी ते शुक्रवारी, २३ जानेवारी या कालावधीत पार पडणारी बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ पुणे आणि परिसरातील क्रीडा, पर्यटन आणि जागतिक ओळखीला नवे परिमाण देईल.

More Stories
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : जागतिक सायकलपटूंसाठी पुण्याचा उत्साहवर्धक अनुभव
यंदाचे ‘एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन’ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना समर्पित
पुण्यातील १२ टक्के मतदारांचा ‘नोटा’कडे कल