पुणे, १९ जानेवारी २०२६: आंतरराष्ट्रीय स्तरावरील बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ सायकल स्पर्धेत सहभागी झालेल्या जागतिक सायकलपटूंनी पुण्यातील आयोजनाची प्रशंसा केली आहे. या स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघ आणि १६४ सायकलपटू सहभागी होत असून, पुण्यातील मार्ग, वातावरण आणि नागरिकांच्या उत्साहाने त्यांना भारावून टाकले आहे.
ऑस्ट्रेलियाचा हेडन जेम्स (टीम नेक्स्ट वेलोफिट) म्हणाला, “मला पुण्यात येऊन खूप आनंद झाला. स्पर्धेचे नियोजन अतिशय चोख आणि उत्तम आहे. रस्ते सायकलिंगसाठी अगदी योग्य आहेत. आमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था उत्तम आहे. लोक खूप प्रेमळ आहेत.”
एस्टोनियाचा तावी कन्निमे (क्विक प्रो टीम) म्हणाला, “मी नुकताच व्यावसायिक सायकलपटू झालो आहे आणि करिअरच्या सुरुवातीला भारतात अशा मोठ्या स्पर्धेत भाग घेताना खूप अभिमान वाटतो. पुण्यातील लोकांचे स्वागत पाहून मी भारावून गेलो. प्रत्येकजण आमचा उत्साह वाढवत आहे.”
ऑस्ट्रेलियाचा जॉन म्हणाला, “येथील रस्ते सायकल चालवण्यासाठी खूप गुळगुळीत आणि वेगवान आहेत. आजचा मार्ग चांगला होता, पण उद्या काही कठीण चढाव आहेत, त्यासाठी आम्ही तयार आहोत. पुण्यातील प्रेक्षकांचा प्रतिसाद थक्क करणारा आहे.”
मलेशियाचा की झे यी (टीएसजी शिमानो तेरेन्गानू) म्हणाला, “भारतात येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. येथे लोक खूप मनमिळावू आहेत. शर्यतीचा मार्ग उत्तम आहे आणि रस्त्यांची स्थिती सायकलिंगसाठी पोषक आहे. मी तर म्हणेन की प्रत्येकाने सुट्टीसाठी भारतात एकदा तरी यावे!”
स्पर्धकांच्या या उत्साहवर्धक प्रतिक्रियांमुळे पुण्याचे जागतिक स्तरावर कौतुक होते, तसेच शहरातील नागरिकांचा खेळ आणि क्रीडा संस्कृतीसाठी असलेला प्रेमळ प्रतिसादही अधोरेखित होतो. बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ फक्त स्पर्धा नाही, तर जागतिक क्रीडा उत्सव म्हणून शहराच्या क्रीडा, पर्यटन आणि जागतिक ओळखीला नवे परिमाण देत आहे.

More Stories
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ढोल-ताशे, शिवगर्जना आणि सेल्फी, प्रोलॉग रेसमध्ये पुणेकरांचा रंगारंग स्वागत
यंदाचे ‘एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन’ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना समर्पित
पुण्यातील १२ टक्के मतदारांचा ‘नोटा’कडे कल