March 5, 2026

‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ : दुसरा टप्पा २१ जानेवारी रोजी; १०९.१५ किमीची आव्हानात्मक शर्यत

पुणे, २० जानेवारी २०२६: आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ अंतर्गत टप्पा क्रमांक दोनच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. हा टप्पा बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता लेडीज क्लब, कॅम्प येथून सुरू होणार असून, नांदेड सिटी, सिंहगड रोड येथे त्याचा समारोप होणार आहे.

या टप्प्यातील स्पर्धा पुणे शहरासह पुरंदर, राजगड आणि हवेली तालुक्यातून जाणार असून, या टप्प्याचे एकूण अंतर १०९.१५ किलोमीटर आहे. देश-विदेशातील नामांकित सायकलपटू या शर्यतीत सहभागी होत असून, ही स्पर्धा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या सायकल स्पर्धांपैकी एक ठरणार आहे.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा इतिहास, निसर्गसंपदा आणि पर्यटनक्षम ठिकाणे जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या आयोजनामुळे जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होण्यासोबतच एक नवा इतिहास घडवला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

असा असेल टप्पा क्रमांक दोनचा मार्ग:
लेडीज क्लब, कॅम्प येथून सुरुवात होऊन गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे, कापूरहोळ, कासुर्डी, मोहरी, जांबळी, आंबवणे, करंजावणे, वांगणी, निघडे, कुसगाव, शिवापूर, कोंढणपूर, सिंहगड घाट रोड, डोणजे, किरकिटवाडी, खडकवासला मार्गे नांदेड सिटी, सिंहगड रोड येथे या टप्प्याचा समारोप होईल.