March 3, 2026

महाशिवरात्री काळात भीमाशंकर मंदिर राहणार बंद; भाविकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन

पुणे, १३ फेब्रुवारी २०२६: सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेऊन सुरू असलेल्या विकासकामांमुळे येत्या महाशिवरात्री काळात मंदिर नित्यदर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा कालावधीत लाखो भाविक येण्याची शक्यता असून त्यापैकी मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकर येथे भेट देतील, असा अंदाज आहे. दररोज सुमारे एक लाख भाविक येथे दाखल होऊ शकतात, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ‘श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७ – गर्दी व्यवस्थापन व इतर सुविधा)’ या विशेष योजनेस मंजुरी दिली आहे.

भव्य सभामंडप व पायाभूत सुविधांची उभारणी

या आराखड्यांतर्गत भाविकांसाठी सुरक्षित व सुसज्ज सुविधा उभारण्याच्या दृष्टीने विविध कामांना गती देण्यात आली आहे. त्यामध्ये –

नवीन भव्य सभामंडपाची उभारणी

सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था

पायरी मार्गाचे बांधकाम

गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा

मुख्य सभामंडप पूर्णतः उतरविण्यात आल्यामुळे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर दगड, बांधकाम साहित्य व यंत्रसामग्री ठेवण्यात आल्याने मंदिर खुले ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महाशिवरात्री काळातही दर्शन बंद:
पूर्वी महाशिवरात्री कालावधी (दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते दि. १८ फेब्रुवारी २०२६) वगळून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या दगडी बांधकामाचे स्वरूप, वेग आणि परिसरातील सुरक्षेच्या बाबींचा सखोल आढावा घेतल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले की, “भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून बांधकाम पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे शक्य नाही.” त्यामुळे महाशिवरात्री काळातही मंदिर नित्यदर्शनासाठी बंद राहणार आहे.

भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर दरम्यान येथे मुसळधार पाऊस पडतो. या काळात बांधकाम करणे अशक्य असल्याने उपलब्ध कालावधीत कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भाविक व स्थानिक नागरिकांना आवाहन केले आहे की, मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे आणि निर्णयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे.

कुंभमेळा २०२७ पूर्वी सर्व पायाभूत सुविधा पूर्ण करून भाविकांना सुरक्षित व सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.