October 16, 2025

कर्करोगाची पुनरावृत्ती रोखण्यासाठी ‘बायोप्लॅटिन’ची मात्रा प्रभावी

पुणे, ०४/०१/२०२५: कर्करोग (कॅन्सर) केवळच रुग्णालाच नाही, तर कुटुंबियांनाही हादरवणारा आजार आहे. अनेकदा बरा झालेला आजार पुन्हा डोके वर काढतो. त्यामुळे कर्करोगाची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पुण्यातील संशोधकांनी औषध शोधून काढले आहे. रसायनी बायोलॉजीक्स संस्थेच्या डॉक्टरांनी तोंडावाटे घेता येणाऱ्या ‘बायोप्लॅटिन’ या औषधाची निर्मिती केली असून, नुकतेच या संशोधनाचे सादरीकरण सिंगापूर येथे झालेल्या ‘युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत करण्यात आले.

या संशोधनाचे प्रमुख संशोधक वैद्य योगेश बेंडाळे म्हणाले, “कर्करोगावरील सध्याच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, रेडिएशन, सायटो-टॉक्सिक औषधे आणि मोनोक्लोनल अँटीबॉडी यांच्यामुळे स्थानिक कर्करोग असलेल्या रुग्णांच्या उपचारांमध्ये मोठे यश मिळाले आहे. परंतु कर्करोगाची पुनरावृत्ती टाळण्याच्या चिकित्सेमध्ये अजूनही मर्यादा आहेत. ही मर्यादा भरून काढण्याचे काम बायोप्लॅटिन करते. या संशोधनाचा केंद्रबिंदू ‘बायोप्लॅटिन’ हे औषध असून, तोंडावाटे घेता येणारे जगातील पहिले नॅनो-प्लॅटिनमवर आधारित संयुग आहे. हे संयुग पेटंट केलेल्या ग्रीन टेक्नॉलॉजीद्वारे विकसित करण्यात आले आहे.”

बहुतेक रुग्णांमध्ये उपचारांनंतरही कर्करोग पुन्हा उद्भवण्याचा धोका संभवतो. तसेच शरीरातील एका भागात असलेला कर्करोग इतरत्र पसरण्याचा धोका असतो. कर्करोगाची पुनरावृत्ती रोखणे किंवा त्यांच्या प्रसारावर नियंत्रण आणणे, हे कर्करोगाच्या उपचारांच्या परिणामांमध्ये मोठी क्रांती घडवून आणू शकते. बायोप्लॅटिन उपचार पद्धती हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही वैद्य योगेश बेंडाळे यांनी स्पष्ट केले. कॅन्सरवरील बहुतेक मूलभूत स्वरूपाचे संशोधन आजही पाश्चात देशात घडते आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्ये ते वापरले जाते. या पार्श्वभूमीवर बायोप्लॅटिन हे १०० टक्के भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेले औषध असल्याचे त्यांनी नमूद केले.

असे केले संशोधन…
रसायनी बायोलॉजिक्सने घेतलेल्या प्री-क्लिनिकल अभ्यासामध्ये सेविअर कम्बाईन्ड इम्युनोडेफिशिएट डिसीज (एससीआयडी) माऊस मॉडेलचा उपयोग केला. या माऊस मॉडेलमध्ये प्रोस्टेट कॅन्सर पेशी टोचून ट्यूमर तयार करण्यात येतो. परंतु बायोप्लॅटिन उपचार घेतलेल्या गटामध्ये ट्यूमर तयार होण्यामध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसले. त्यातून या संशोधनामुळे कर्करोगाची पुनरावृत्ती रोखण्यासाठी या संयुगाची क्षमता असल्याचे अधोरेखित झाले. विशेष म्हणजे, पारंपरिक प्लॅटिनम औषधांप्रमाणे दिसणारे दुष्परिणाम (मायेलोसप्रेशन) बायोप्लॅटिन घेतलेल्या प्राण्यामध्ये आढळले नाही. तोंडावाटे सेवन शक्य असल्याने आरोग्याच्या फारशा चांगल्या आरोग्य सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंतही याचा सहज पोहोचवता येऊ शकते, असेही वैद्य बेंडाळे म्हणाले. आजवर जगात प्लॅटिनमयुक्त औषधांचा वापर कॅन्सरच्या रुग्णांमध्ये शिरेवाटे इंजेक्शन देऊन केला जातो आणि सुमारे ७० टक्क्यांहून अधिक कॅन्सरच्या प्रकारामध्ये हे औषध कॅन्सरच्या रुग्णाला दिले जाते. परंतु बायोप्लॅटिनचे वैशिष्ट्य हे केवळ तोंडावाटे दिले जाणारे औषध नसून रुग्णाच्या व्याधिप्रतिकार क्षमतेमार्फत याचे कार्य घडत असल्याचे विशेषतः दिसून आले.

“या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या लवकरात लवकर पूर्ण करून हे जीवनावश्यक औषध भारतात उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मूलभूत संशोधन त्यातही कॅन्सरवरील संशोधनाचा खडतर प्रवास पूर्ण करून भारताला वैद्यकीय संशोधनामध्ये कसे योगदान देता येईल, या ध्येयाने सर्व शास्त्रज्ञ काम करीत आहेत. या प्रक्रियेला गती देण्यासाठी समविचारी सर्व लोक व संस्थानी एकत्र येऊन आम्हाला सहकार्य केल्यास भारताच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरेल” – वैद्य योगेश बेंडाळे, प्रमुख संशोधक, रसायनी बायोलॉजीक्स पुणे

You may have missed