January 3, 2026

अमोल बालवडकरांच्या टीकेला भाजप उमेदवार लहू बालवडकरांचे जशास तसे प्रत्युत्तर

पुणे, २ जानेवारी २०२५ : भाजपच्या नेत्यांवर टीका करणारे वक्तव्य केल्यानंतर आता भाजपचे प्रभाग क्रमांक ०९ मधील अधिकृत उमेदवार लहू बालवडकर यांनी थेट आणि आक्रमक शब्दांत अमोल बालवडकर यांना जशास तसे उत्तर दिले आहे. पक्षाची शिस्त, नेतृत्वाचा सन्मान आणि कार्यकर्त्यांची ताकद यावर भाष्य करत लहू बालवडकर यांनी टीका करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.

आपल्या प्रतिक्रियेत लहू बालवडकर म्हणाले, “भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक ०९ मधील मी अधिकृत उमेदवार आहे. आम्ही भाजपाचे सर्व कार्यकर्ते अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करत आहोत. मात्र, हे शांततेचे वातावरण बिघडवण्याचे काम ज्यांची उमेदवारी डावलली गेली आहे, त्यांच्याकडून होत आहे.”

भाजप नेतृत्वावर टीका करणाऱ्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, “भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचे नेते हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांच्यावर जर कोणी गरळ ओकत असेल, तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत.”

अमोल बालवडकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत लहू बालवडकर पुढे म्हणाले, “इतके दिवस ज्या नेत्यांच्या पाठिंब्यावर राजकारण केले, मोठमोठी पदे मिळवली, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवली, त्यांच्यावर अशा शब्दांत बोलताना लाज सुद्धा वाटत नाही का?” तसेच शिवराळ भाषेच्या वापरावरही त्यांनी इशारा दिला.

“जर खालच्या पातळीवर जाणार असाल, तर ती भाषा आम्हालाही जमते. मग ठकास आम्ही महाठक आहोत, हे पण समजून घ्या,” असा टोला त्यांनी लगावला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच पराभवाची जाणीव झाल्याने टीका सुरू असल्याचा आरोप करत लहू बालवडकर म्हणाले, “सध्या सूर्यावर थुंकण्याचा धंदा सुरू आहे. तो त्वरित थांबवा, नाहीतर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल.”

आपल्या वक्तव्याच्या शेवटी त्यांनी थेट इशाराही दिला. “हा सल्ला समजा, समजावणी समजा किंवा तंबी समजा. असे धंदे बंद करा, नाहीतर भाजपाचा कार्यकर्ता संतापला तर काय होऊ शकते, हे तुम्हाला माहीतच आहे,” असे म्हणत त्यांनी टीकेला पूर्णविराम देण्याचे आवाहन केले.