January 3, 2026

प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार

पुणे, २ जानेवारी २०२६: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक २० (बिबवेवाडी – शंकर महाराज मठ) येथील अधिकृत उमेदवारांनी उत्साहात निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. सकाळी ठीक दहा वाजता शंकर महाराज मठ येथे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार राजेंद्र आबा शिळीमकर, तन्वी प्रशांत दिवेकर, मानसी मनोज देशपांडे आणि महेंद्र सुंदेचा मुथ्था उपस्थित होते. त्यानंतर उमेदवारांनी ईशान्य सोसायटी, राजधानी सोसायटी, रॉयल आर्केड आणि गुरुराज सोसायटी या भागांमध्ये भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला.

या संवादादरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, नागरी सुविधा आणि सुरक्षा यासंबंधी विविध समस्या व अपेक्षा मांडल्या. उमेदवारांनी भाजपच्या माध्यमातून विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन दिले.

सायंकाळी पाच वाजता झाला कॉम्प्लेक्स, कल्याण भेळ परिसर, राजमाता कॉम्प्लेक्स, कांचनगंगा आणि लाईट हाऊस सोसायटी येथे प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांचे स्वागत केले. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध घटकांशी संवाद साधत उमेदवारांनी भाजप सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

“प्रभाग क्रमांक २० चा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे उमेदवारांनी सांगितले. तसेच आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या प्रचारादरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण प्रचार दौरा शिस्तबद्ध, सकारात्मक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.