January 17, 2026

भाजपची हॅटट्रिक, मोहोळे सव्वा लाखाने विजयी

पुणे, ४ जून २०२४: प्रचंड यंत्रणा, कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या भाजपला पुणे लोकसभा मतदार संघात विजयाची हॉट्रिक करण्यासाठी दमछाक करावी लागली. तर गेल्या दोन लोकसभा निवडणुकीचा विचार करता या लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते पाहता कॉंग्रसेच्या परिस्थीती काहीशी सुधारणा झाल्याचे दिसले. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांना विचार कराव्यास लावणारी ठरली.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सुमारे एक लाख तेवीस हजाराहून अधिक मताधिक्याने विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांचा सरळ पराभव केला. या विजयाने पुणे हा आमचा बालेकिल्ला असल्याचे दाखविण्याची संधी भाजपाला पुन्हा एकदा मिळाली.

उमेदवारांची घोषणा झाली, तेव्हा सुरवातीच्या काळात महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र होते. परंतु प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीने शर्थीचे प्रयत्न केल्याने चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे विजयाची माळ कोणाच्या गाळ्यात पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामध्ये अखेर भाजपने बाजी मारली.

कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१४ च्या निवडणुकीत या मतदार संघाने अनिल शिरोळे यांना ९१ हजार १७७ हजाराचे मताधिक्य दिले होते. तर २०१९ च्या निवडणुकीत या मतदार संघाने १ लाख ५ हजाराचे मताधिक्य दिले होते. या दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या प्रचंड मताधिक्यामध्ये सर्वाधिक वाटा याच विधानसभा मतदार संघाचा होता. यंदाची राजकीय परिस्थीती मात्र वेगळी होती. शिवसेनेची ताकद या मतदार संघात आहे. तर कॉंग्रेसला मानणारा काही मतदार आहे. त्यामुळे मोहोळ यांच्या मताधिक्याकडे लक्ष लागले होते. परंतु पंचाहत्तर हजाराहून अधिक मतधिक्य देत मोहोळ यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत या मतदार संघात धंगेकर यांच्या रूपाने कॉंग्रेसच्या मतांचा टक्का वाढला असला, तरी मोहोळ यांना यांच्या मतदार संघात रोखण्यात त्यांना फारसे यश आले नाही.

तर एक वर्षांपूर्वी कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत धंगेकर विजयी झाले होते. त्यामुळे लोकसभेला देखील धंगेकर तेथून मताधिक्य घेतील, असा दावा कॉंग्रेसकडून गेला जात होता. मागील दोन निवडणूकांमध्ये भाजपच्या उमेदवारला या मतदार संघाने पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य दिले होते. पोटनिवडणुकीतील विजयाच्या जोरावर धंगेकर यांना लिड मिळेल, असा दावा केला जात होता. कॉंग्रेसच्या जोडीला उध्दव बाळासाहेब ठकारे शिवसेनेची ताकद होती. तरी देखील मात्र मतदार संघातून मोहोळ यांनी १७ हजाराचे मताधिक्य घेत हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले.

पुणे कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदार संघाने दोन्ही निवडणूकीत भाजपचे कमळ फुलविले. परंतु यंदा या मतदार संघाने धंगेकर यांना ‘हात’ दिला. दोन निवडणूकीत भाजपकडे गेलेला मागीसवर्गीय आणि मुस्लिम मतदार यंदा पुन्हा आपल्याकडे वळविण्यात कॉंग्रेसला यश आले. त्यामुळेच या एकमेव मतदार संघातून धंगेकर यांना १२ हजाराचे मताधिक्य मिळाले. तर सोसायट्यांबरोबरच वस्ती आणि झोपडपट्ट्यांचा शिवाजीनगर मतदार संघ आहे. या मतदार संघातून मोहोळ यांना अवघे साडेतीन हजाराचे मताधिक्य मिळाले. यापूर्वी याच मतदार संघाने भाजपला तीस ते पन्नास हजार मताधिक्य झाले होते. या निवडणूकीत मात्र वस्ती विभाग विरूद्ध सोसासायटींचा भाग असे मतविभाजन झाल्याने मोहोळांना साडेतीन हजाराच्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले.

कोथरूड पाठपोठ गेल्या दोन निवडणुकीत वडगावशेरी मतदार संघाने भाजपच्या उमेदवाराच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. तीच परंपरा कायम ठेवत या मतदार संघाने मोहोळ यांना मताधिक्य दिले. परंतु ते कवेळ १४ हजाराचे, येथेही वस्ती आणि झोपडपट्टीधारकांची मते आपल्याकडे वळविण्यात कॉंग्रेसला यश आले. परिणामी मागील दोन निवडणूकाइतके भाजप उमेदवाराला या मतदार संघातून मताधिक्य रोखण्यास यश आले. पर्वती विधानसभा मतदार संघातील सहकारनगर, सिंहगड रस्ता आणि वस्ती भाग भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याने २९ हजाराचे मताधिक्य मोहोळ यांना मिळाले.

२०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकीत तिरंगी होऊन देखील भाजपला मोठे मताधिक्य मिळाले होते. त्या तुलनेत मोहोळ यांच मताधिक्य कमी झाले. वंचितचे मोरे यांना सुमारे सुमारे ३२ हजार मते मिळाली. मोहोळ यांना मिळालेले मताधिक्य पाहता मोरे यांच्या उमेदवारीने मोहोळ आणि धंगेकर यांना मिळणाऱ्या मतावर फारसा परिणाम झाला नाही. या उलट गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला मिळालेली मते विचारात घेतली, तर तेवढी मते देखील मिळविण्यात मोरे यांना यश आले नाही. एमआयएमचे उमेदवार अंनिस सुंडके यांना जेमतेम एक हजार मते मिळाली.यावरून भाजपच्या विरोधात मराठा, मुस्लिम आणि ओबीसी यांची साथ मिळून देखील कॉंग्रेसच्या ‘हाता’ला यश मिळविता आले नाही.