पुणे, २४ नोव्हेंबर २०२५: शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना पुणेकरांनी मोठ्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महाअभियानाला अतुलनीय प्रतिसाद दिला. तब्बल ५६ रक्तदान शिबिरांतून १० हजार ३३८ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन झाले असून या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मोहोळ यांनी पुणेकरांप्रती मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
मोहोळ म्हणाले, “पुणेकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. समाजाच्या सर्व स्तरातून मिळालेला सहभाग ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. रक्तदानाचा हा उपक्रम केवळ वाढदिवसाचे औचित्य नव्हते, तर सामाजिक एकोपा आणि संवेदनशीलतेचे प्रतीक होते. पुणेकरांनी दाखवलेले प्रेम म्हणजेच माझी खरी ताकद आहे.”
मोहोळ यांनी यावेळी भविष्यातील रक्तउपलब्धता सुदृढ करण्यासंदर्भातही महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “आपत्कालीन परिस्थितीत रक्त सहज उपलब्ध व्हावे यासाठी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या पुणेकरांची एक व्यापक सूची तयार करण्याचे काम सुरू आहे. विशेषतः दुर्मिळ रक्तगट असलेल्या दात्यांचा समावेश करण्यात येणार असून त्याचा थेट लाभ गरजू रुग्णांना मिळेल.”
याशिवाय रक्तदाते आणि रुग्ण यांच्यामधील संपर्क सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित पाऊल उचलण्यात येत असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. “रक्तदाते व रुग्ण यांच्यासाठी एक विशेष ऑनलाईन पोर्टल विकसित केले जात आहे. रक्त देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना येथे नोंदणी करता येईल, तर गरज पडल्यास रुग्ण किंवा रुग्णालयांना थेट संपर्क साधता येईल. यामुळे रक्त मिळवण्यासाठी रुग्णांना रुग्णालयांमध्ये किंवा सोशल मीडियावर मदतीसाठी भटकंती करावी लागणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणेकरांनी दिलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे शहरात सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा अधिक बळकट झाली असून या महाअभियानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही