January 7, 2026

पुणे–पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र: रोहित पवारांनी केली अधिकृत घोषणा

पुणे, २९ डिसेंबर २०२५: पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा रोहित पवार यांनी केली. व्हीएसआय येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहिती आणि त्यांच्या इच्छेनुसार ‘घड्याळासोबत जाणे’ अधिक योग्य ठरेल, असा निर्णय झाला आहे. आम्ही तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढणार असून हा निर्णय पूर्णतः कार्यकर्त्यांच्या हितासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रशांत जगताप यांच्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ते चांगले कार्यकर्ते होते, मात्र त्यांनी असा निर्णय का घेतला याची माहिती नाही. प्रत्येक शहरात राजकीय समीकरणे वेगवेगळी असतात, त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, उद्या तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हांकडून एबी फॉर्म वाटप केले जाणार आहे. त्यानंतर नेमके कुणाला किती जागा मिळणार, हे स्पष्ट होईल. कार्यकर्त्यांची जी इच्छा होती, तोच निर्णय आम्ही घेतला आहे, असे रोहित पवार म्हणाले.

महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिकेत ज्यांची सत्ता होती त्यांनी अपेक्षित कामे केली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

उद्योगपतींशी भेटींबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना रोहित पवार म्हणाले की, आम्ही टाटा, अदानी यांना भेटलो आहे.

सीएसआरच्या माध्यमातून जे लोक समाजासाठी मदत करतात, लोकांच्या मदतीला धावून जातात, त्यांची मदत आम्ही घेत असतो. ते कुठल्याही राजकारणासाठी आले नव्हते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या प्रक्रियेत गेल्या काही दिवसांत मोठे राजकीय उलटसुलट घडले. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र होते. मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या सतत बदलत्या भूमिकेमुळे पुण्यातील राजकारणात कायम उलटसुलट निर्णय पाहायला मिळाले असून, शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अशा पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुढाकार घेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, अशी स्पष्ट घोषणा केल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण आकाराला येत असल्याचे चित्र आहे.