September 13, 2024

कोविड काळात १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत दाखविलेली संवेदना, बांधिलकी कौतुकास्पद – प्रभाकर करंदीकर

पुणे, दि. २४ एप्रिल, २०२३ : नऊ वर्षांपूर्वी १०८ रुग्णवाहिका ही सेवा सुरु करणे, डॉक्टर्स, अधिकारी इतकेच काय तर रुग्णवाहिका वाहक यांना तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित करणे हे काम स्वप्नवत होते. मात्र याच १०८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी व डॉक्टरांनी कोविड सारख्या जागतिक संकटकाळात आपले चोख कर्तव्य बजावत रूग्णांप्रती दाखविलेली संवेदना, बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येत असलेल्या आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस) व आपत्कालीन प्रतिसाद केंद्रातील डॉक्टर्स, जिल्हानिहाय व झोननिहाय अधिकारी, फ्लीट इंजिनिअर्स, बायोमेडिकल इंजिनिअर्स व रुग्णवाहिका वाहकांचा स्मृतीचिन्ह व मानपत्र देत नुकताच सन्मान करण्यात आला त्यावेळी करंदीकर बोलत होते. औंध चेस्ट हॉस्पिटलच्या इमारतीत असलेल्या राज्यभरातील १०८ रुग्णवाहिकांच्या मध्यवर्ती कार्यालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्याचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, १०८ रुग्णसेवेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. ज्ञानेश्वर शेळके, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मुख्य इंटेन्सीव्हिस्ट व १०८ रुग्णवाहिका संकल्पनेचे प्रणेते डॉ. प्रसाद राजहंस, पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारे, पुणे जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, बीव्हीजी इंडियाच्या वैशाली गायकवाड, मुख्य व्यवस्थापक डॉ शरद सबनीस आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

नुकतेच लोणावळा येथील बस दुर्घटनेतील मदतकार्यात सहभागी असलेल्या आणि त्याठिकाणी १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत असणाऱ्या बीव्हीजीच्या डॉक्टर्स, रुग्णवाहिका वाहक व अधिकारी यांचा विशेष सन्मान कार्यक्रमादरम्यान करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रभाकर करंदीकर म्हणाले, “आज बीव्हीजी इंडियाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत असलेली मोफत १०८ रुग्णवाहिका सेवा ही संपूर्ण देशात सर्वोत्कृष्ट काम करीत आहे. मात्र नजीकच्या भविष्याचा व प्रगत देशांत आज देण्यात येत असलेल्या सेवा पाहता आपल्याला आणखी लांबचा पल्ला गाठायचा आहे. सेवेचे कर्तव्य बजावीत असताना संवेदना, सहवेदना जपणे हे देखील महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच या सेवा देत असताना बीव्हीजीच्या कर्मचाऱ्यांनी समाजासमोर एक वस्तुपाठ घालून दिला आहे.” याबरोबरच एक्स्प्रेसवेज आणि महामार्ग यांसाठी रुग्णवाहिकांची स्वतंत्र यंत्रणा असणे गरजेचे आहे याकडे देखील करंदीकर यांनी लक्ष वेधले.

कोविडच्या संकटकाळात जिथे अनेक कुटुंबातील सदस्य देखील आपल्या रुग्णाला विचारात नव्हते अशा काळात १०८ रुग्णवाहिका व संबंधित अधिकारी, कर्मचारी, वाहक यांद्वारे सामान्य रुग्णांची करण्यात आलेली सेवा ही पराकोटीची असल्याचे चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.

समाजऋण फेडण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा ध्यास मनी बाळगून बीव्हीजी इंडिया १०८ रुग्णवाहिकेची ही सेवा देण्यास तत्पर आहे. आजवर देशभरातील १ कोटी ४ लाख रुग्णांना याचा फायदा झाला आहे. केवळ व्यवसाय अथवा काम म्हणून नाही तर याकडे एक व्रत म्हणून पहा हा माझा विचार बीव्हीजी इंडियाचे कर्मचारी सार्थ ठरवीत आहेत याचा मला अभिमान आहे, असे हणमंतराव गायकवाड म्हणाले.

इतर राज्यात आपत्कालीन सेवेत पॅरामेडिकल स्टाफ असतात आपली १०८ ही रुग्णवाहिका अत्याधुनिक आहेच शिवाय डॉक्टर्स व इतर आवश्यक बाबींनी परिपूर्ण आहे असे सांगत डॉ राजहंस यांनी नजीकच्या भविष्यातील ही सेवा हेलिकॉप्टर, ड्रोन व कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने आणखी अत्याधुनिक कशी करता येईल याबद्दल माहिती दिली.

तर डॉ. शेळके यांनी मागील ९ वर्षात तब्बल १ कोटी ४ लाख रुग्णांना या सेवेचा फायदा कसा झाल्याचे सांगत कोविड काळात ६ लाखांहून अधिक आपत्कालीन रुग्णांना याचा लाभ झाला याकडे लक्ष वेधले.

रिबर्थ ऑर्गन डोनेशन ट्रस्टचे प्रतिनिधी अरविंद अगरवाल यांनी कार्यक्रमानंतर अवयवदानाचे महत्त्व सांगत उपस्थितांना अवयवदान करण्यासाठी आवाहन केले. डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी प्रास्ताविक केले, डॉ. सुनील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. मेघना झेंडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.