May 19, 2024

पुणे मेट्रो लाईन ३ साठी २००० सेगमेंट्सची उभारणी पूर्ण, अवघ्या नऊ महिन्यात उभारले १९९९ सेगमेंट्स

पुणे, २४ एप्रिल, २०२३: हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या कामाने चांगलाच वेग पकडला आहे. विविध टप्प्यांतील कामे निश्चित गतीने पुढे सरकत आहेत. यापैकी एक महत्वपूर्ण टप्पा आज (सोमवारी) सकाळी गाठण्यात आला असून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठीच्या २००० सेगमेंट्सची उभारणी आज पूर्ण करण्यात आली आहे.

विशेष नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, २३ जुलै २०२२ रोजी या प्रकल्पाचा पहिला सेगमेंट हिंजवडी येथे उभारण्यात याला होता त्यानंतर बरोबर अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल दोन हजार सेगमेंट्स उभे करण्यात विकसकांनी यश प्राप्त केले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’ तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे.

या कामाच्या अनुषंगाने पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी, पुणे मेट्रो लाईन ३ बाबत विविध बाबींची चर्चा करण्यात आली तसेच या कामाच्या एकंदर प्रगतीचा आढावा देखील घेण्यात आला. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रो अतिशय महत्वाची असून मा. उपमुख्यमंत्री यांनी समक्ष या मार्गाला भेट देण्यासाठी आणि प्रगती पाहण्यासाठी पुण्यात यावे, असे आमंत्रण पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या वतीने या बैठकीत देण्यात आले.

“हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे सुलभ, वेगवान व स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी विकसक पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. याचेच फलित म्हणून अवघ्या नऊ महिन्यात दोन हजार सेगमेंट्स उभारणी करणे तसेच काम सुरू झाल्यापासून वर्षभरातच एकूण खांब उभारणीपैकी ५०% खांब उभारणी पूर्ण करण्याचा टप्पा गाठण्यात आम्हाला यश मिळालेले आहे,” अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आलोक कपूर यांनी दिली.

“हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर मेट्रोने प्रवास करताना नागरिकांना उत्तम अनुभूती मिळावी यासाठी आम्ही काम करत आहोत. विशेषत: मेट्रो स्थानकांचे तसेच ट्रेनच्या अंतर्गत रचनेचे आरेखन करताना आम्ही प्रवासीकेंद्रित मानसिकतेचा अभ्यास करून (थिंक लाईक कस्टमर) डिझाईन्स बनवत आहोत. पुणे मेट्रो लाईन ३ च्या कामामध्ये आरंभापासूनच पुण्यातील नागरीकांनी मेट्रो कंपनीला दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत,” असे पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या बिझनेस हेड आणि संचालिका नेहा पंडित यांनी नमूद केले.

पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.