पुणे, ५ फेब्रुवारी २०२५ ः दूषित पाणी हाच गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीलिकेचएस) हा आजार होण्याचे प्रमुख कारण आहे, अशी माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या तपासणीतुन पुढे आली आहे. “जीबीएस’चे रुग्ण पुर्वी आढळत होते, मात्र आता मोठ्या संख्येने रुग्ण आढळण्याची कारणेही “एनआयव्ही’कडुन शोधली जाणार आहेत. दरम्यान, “एनआयव्ही’ने महापालिकेस केलेल्या सुचनांवर कार्यवाही करण्याबरोबरच संबंधित गावांसाठी छोटा जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्याचा महापालिकेचा विचार सुरु आहे.
“जीबीएस’ वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर महापालिका प्रशासन, एनआयव्ही व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी महापालिकेत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत “एनआयव्ही’च्या अधिकाऱ्यांनी तपासणी अहवालाबाबतची माहिती दिली. “जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर “एनआयव्ही’ने केलेल्या सुचनांबाबत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, “जीबीएस’ची लागण दूषित पाण्यामुळेच होत असल्याची माहिती “एनआयव्ही’ने केलेल्या पाण्याच्या तपासणीतुन पुढे आली आहे. जीबीएसचे रुग्ण यापुर्वीही आढळत होते, मात्र आत्ताच जास्त रुग्ण का आढळत आहेत, याचा शोध एनआयव्ही घेत आहे. त्यासाठी पाण्याचे नमुने १०० मिलिलीटर ऐवजी २ लिटर घेण्यात येणार आहेत. हे पाणी दीर्घकाळ साठवून ठेवल्यानंतर त्याची तपासणी केली जाणार आहे. जलवाहिन्यांद्वारे नागरीकांपर्यंत पाणी पोचताना, त्यामध्ये क्लोरीनची मात्रा ०.३ पीपीएम इतकी असण्याची गरज आहे. महापालिकेच्या पाण्यात क्लोरीनचे प्रमाण ०.६ ०.७ असते. याबरोबरच बाधितांच्या शौच तपासणीसाठी घेऊन ते काळी काळ जतन करण्यात यावे, अशा सुचना “एनआयव्ही’ने दिल्या आहे.’
“एनआयव्ही’ला खासगी रुग्णालयांचे असहकार्य व छोट्या जलशुद्धीकरण केंद्राबाबत पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, “जीबीएस आजाराचे काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. “एनआयव्ही’चे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडुन रुग्णांची भेट घेऊन नमुने घेण्याचे काम केले जात आहेत. काही रुग्णालये मात्र, सहकार्य करत नसल्याची तक्रार “एनआयव्ही’ने केली आहे. त्यानुसार, संबंधित खासगी रुग्णालयांनी सहकार्य करावे, अशा सुचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, सणसनगर, डीएसके विश्व या गावांमध्ये धरणातील पाणी प्रक्रिया न करता दिले जाते. त्यामुळे संबंधित भागासाठी एक दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचा छोटा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा विचार सुरू आहे. महिनाभरात हा प्रकल्प उभा राहू शकतो, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.
* शहरातील सर्व आरओ प्लांटसाठी करणार “एसओपी’
नागरीकांनी शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजुनही खासगी पाणी शुद्धीकरण केंद्रांकडुन (आरओ) दूषित पाण्याचा पुरवठा केला जातो. महापालिकेने अशा आरओ प्लांटला टाळे ठोकण्याचे काम केले. आता शहरातील सर्वच आरओ प्लांटसाठी महापालिका निश्चित कार्यपद्धती (एसओपी) करणार आहे. येत्या काही दिवसात “एसओपी’ तयार करुन त्यांची कार्यवाही केली जाणार असल्याचे पृथ्वीराज बी.पी.यांनी सांगितले.

More Stories
पुणे ग्रँड टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख रस्त्यावरील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला