पुणे, दि. २७ फेब्रुवारी २०२५: दर्जेदार वीजसेवा व ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणच्या पिंपरी विभागातील सांगवी उपविभागाचे विभाजन करून नवीन हिंजवडी उपविभागाची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी या चार शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. नव्याने तयार झालेल्या हिंजवडी उपविभागाचे कार्यालय आणि नवीन चार शाखा कार्यालयांमध्ये एकूण ८८ तांत्रिक व अतांत्रिक नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत.
पुणे परिमंडल अंतर्गत पिंपरी विभागाच्या सांगवी उपविभागात यापूर्वी सांगवी, ताथवडे व हिंजवडी असे तीन शाखा कार्यालय होते. माहिती तंत्रज्ञानाच्या विविध कंपन्यांचे आयटी हब तसेच विजेसह नवीन वीजजोडण्यांच्या वाढत्या मागणीमुळे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगवी उपविभागाच्या विभाजनाचा आणि नवीन हिंजवडी उपविभाग व चार नवीन शाखा कार्यालयांच्या निर्मितीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठवला होता. त्यास मंजूरी देत महावितरणने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे.
सांगवी उपविभागाच्या पुनर्रचनेत सांगवी उपविभागात आता सांगवी, पिंपळे गुरव (नवीन), पिंपळे निलख (नवीन) व वाकड (नवीन) असे चार शाखा कार्यालय राहतील तर नवीन हिंजवडी उपविभागात ताथवडे, हिंजवडी आणि हिंजवडी एमआयडीसी (नवीन) असे तीन शाखा कार्यालय राहतील. पूर्वीच्या सांगवी उपविभागात एकूण २ लाख ५६ हजार ग्राहक होते. पुनर्रचनेनंतर सांगवी उपविभागात १ लाख ४० हजार आणि नवीन हिंजवडी उपविभागात १ लाख १६ हजार वीजग्राहक असतील.
नवीन हिंजवडी उपविभाग कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे ६ पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद असे १२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नवनिर्मित पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालयीन सहायक असे प्रत्येकी १९ पदे मंजूर करण्यात आले आहेत.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत हिंजवडी, चाकण एमआयडीसी व भोसरी-२ या तीन उपविभागांची तसेच ११ शाखा कार्यालयांची तसेच नवीन ८८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडीसाठी नवीन उपविभाग व शाखा कार्यालयाबाबत वीजग्राहक व लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती पूर्ण झाल्यामुळे वीज व ग्राहकसेवा आणखी दर्जेदार होईल.

More Stories
PCMC: शहराच्या दररोज पाणीपुरवठ्यासाठी पक्ष बाजूला ठेवून सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज : राहुल कलाटे
निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरुस्तीसाठी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्पर्धामार्गावरील शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी