December 13, 2024

मुठा नदीला पार करत पुणे मेट्रो धावली रुबी हॉल स्थानकापर्यंत

पुणे: आज दिनांक २७/०३/२०२३ रोजी पुणे मेट्रोची सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक ही चाचणी घेण्यात आली. ठीक ३.५० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून मेट्रो ट्रेन निघाली. ४.०७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानक येथे ट्रेन पोहोचली. ट्रेनचा वेग १० किमी प्रति तास असा होता. मुळा-मुठा संगम पूल पार करून ट्रेन मंगळवार पेठ (RTO) स्थानक येथे पोहोचली. तेथून पुणे रेल्वे स्थानक पार करून रुबी हॉल स्थानकात नियोजित वेळेनुसार पोचली. चाचणी दरम्यान ठरलेली उद्दिष्ट पार पडले. चाचणी अत्यंत व्यवस्थित पार पडली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही १२ किमीची मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक – सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक – रुबी हॉल स्थानक या एकूण १२ किमीची मार्गिका लवकरच प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येतील.

गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गीकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी दिनांक २५/११/२०२२ रोजी घेण्यात आली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावर चाचणी दिनांक ३१/१२/२०२२ रोजी घेण्यात आली. आज दिनांक २७/०३/२०२३रोजी सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक- मंगळवार पेठ (RTO) – पुणे रेल्वे स्थानक – रुबी हॉल स्थानक या मार्गावर चाचणी घेण्यात आली. या तिन्ही मार्गीकेवरील कामे जवळपास संपुष्टात आली आहेत. उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण झाल्यावर या मार्गीकांचे सी एम आर एस निरीक्षण करण्यासाठी रेलवे सुरक्षा आयुक्त यांना बोलावण्यात येईल आणि लवकरच सी एम आर एस यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू करण्यात येईल.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गीकेवर मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत. यामुळे आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज जोडले जाणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याच्या नागरिकांना या भागात येणे-जाणे सोयीचे होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे. मेट्रो स्थानकावरून रेल्वेच्या सर्व फलाटांवर जाणे सहज शक्य होईल. मंगळवार पेठ स्थानक (RTO) हे अत्यंत गजबिल्या ठिकाणी आहे. आरटीओ कार्यालयात येणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच या भागात शाळा इंजिनिअरिंग कॉलेज, नायडू हॉस्पिटल ही महत्वाची ठिकाणे आहेत. या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना या मेट्रो स्थानकामुळे फायदा होणार आहे.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, “आज घेण्यात आलेली चाचणी नियोजित उद्दिष्ठानुसार पार पडली. लवकरच पुणे रेल्वे स्थानक, RTO व रुबी हॉल मेट्रो नेटवर्क द्वारा जोडले जाईल”.