पुणे, 8 मे 2023 – डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित डेक्कन जिमखाना राज्यस्तरीय 13 वर्षाखालील बास्केटबॉल स्पर्धेत राज्यभरातून 700 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा डेक्कन जिमखाना क्लबच्या बास्केटबॉल कोर्टवर 9 ते 13 मे 2023 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना डेक्कन जिमखाना स्पर्धा संयोजन समितीचे सचिव अपुर्व सोनटक्के व बास्केटबॉल विभागाचे सचिव चंद्रशेखर आपटे यांनी सांगितले की, स्पर्धेत पुणे, नागपुर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, नगर, धुळे, सोलापुर, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी या ठिकाणांहून 700 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये मुलींच्या गटात 28संघांनी, तर मुलांच्या गटात 30 संघांनी सहभाग नोंदवला आहे.
सध्या तीव्र उन्हामुळे ही स्पर्धा सकाळी 6 ते 9 सत्रात तर, सांयकाळी 5 ते 8 या दोन सत्रात घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंची राहण्याची व्यवस्था विमलाबाई गरवारे शाळा व महर्षी कर्वे महिला एज्युकेशन इन्स्टिटयूट या ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघातील खेळाडूंची निवड महाराष्ट्र बास्केटबॉल संघात करण्यात येणार असून हा संघ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक, प्रशस्तिपत्रक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट सामनावीर, सर्वोत्कृष्ट मालिकावीर आणि उदयोन्मुख खेळाडू यांनादेखील करंडक, प्रशस्तिपत्रक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे आपटे यांनी नमूद केले.
More Stories
पुणे: शहराच्या प्रवेशद्वारावर व्हीआयपी स्वच्छतागृह
.. तर पुण्याचे महापौरपद आऱपीआयला मिळावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले