पुणे, २०, फेब्रुवारी २०२५ : औंध येथील परिहार चौकातील शिवदत्त मिनी मार्केटमधील ३० व्यावसायीकांना बेकायदेशीररित्या पथ विक्रेता परवाने दिल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या तत्कालीन उपायुक्तावरील दोषारोप निश्चित झाले आहेत. याप्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू करण्याची प्रक्रियेचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.
औंध येथील परिहार चौकामध्ये शिवदत्त मिनी मार्केटमधील ३० व्यावसायीकांना महापालिकेच्यावतीने मागील वर्षी पथ विक्रेता परवाने देण्यात आले आहेत. वाहतूक कोंडीसाठी सोडविण्यासाठी परिहार चौकालगत महापालिकेच्या जागेत असलेलेे गाळे हटवावेत यासाठी माजी नगरसेविका अर्चना मुसळे आणि त्यांचे पती ऍड. मधुकर मुसळे हे गेली काही वर्षे सातत्याने आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान मुसळे दांम्पत्याने या व्यावसायीकांना बेकायदेशीररित्या परवाने देण्यात आल्याचे तसेच तत्कालीन उपायुक्तांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याप्रकरणी चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली होती. .
चौकशीमध्ये या शिवदत्त मिनी मार्केट सुरू करण्यापासून आतापर्यंतच्या घडामोडींची बारकाईने पुराव्यांनिशी चौकशी करण्यात आली. त्यामध्ये ज्या उपायुक्ताने पुर्वी या व्यावसायीकांना परवानगी नाकारली त्यानेच मागीलवर्षी या व्यावसायीकांना पथ विक्रेता धोरणानुसार परवाने दिले. २०१७ पासून बायोमेट्रीक परवाने बंद असताना या अधिकार्याने हे परवाने दिले. परवाने देताना र्औध परिसर त्यांच्या अखत्यारित नसताना त्यांनी परस्पर परवाने दिल्याची गंभीर बाब समोर आली. ३० व्यावसायीकांपैकी पाच जणांनी महाराष्ट्रात पंधरा वर्षांपासून राहात असल्याचे डोमीसाईल प्रमाणपत्र दिले नसतानाही त्यांच्या नावाने परवाने दिल्याचे चौकशीत उघडकीस आले. महिन्याभरापुर्वी आयुक्तांनी याप्रकरणी संबधित उपायुक्तावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी महिन्यापुर्वी आदेश दिले असताना अद्याप खातेनिहाय चौकशी करण्यासाठी अधिकार्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या प्रकरणात उपायुक्तासोबतच अगदी अतिक्रमण निरीक्षकांसोबत अनेकांचा सहभाग असताना त्यांच्यावर कुठलिच कारवाई झालेली नाही. यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे चौकशी केली असता, ते म्हणाले संबधित उपायुक्ताची चौकशी करण्यासाठी अधिकारी नियुक्तीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. यापुर्वी नियुक्त केलेल्या समितीने संबधित उपायुक्तावर केलेले दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. उलट त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान संबधित उपायुक्ताकडे असलेले अधिकार काढून घेण्यात येणार का याबद्दल बोलताना पृथ्वीराज यांनी सांगितले, की पुढील कार्यवाही आयुक्तांच्या आदेशानुसार होईल.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही