June 14, 2024

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव

पुणे, २७/०३/२०२३ : पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन-२०२० व विशेष सेवा पदक सन-२०२० विजेत्यांना पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे येथे पदक देवून गौरविण्यात आले.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर, पोलिस अधीक्षक पोलिस संशोधन केंद्र ज्योती क्षीरसागर उपस्थित होते.

सन्मानचिन्ह पदक तसेच विशेष सेवा पदक विजेत्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा देवून संजय कुमार म्हणाले, पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांनी केलेल्या गुणवत्तापूर्वक सेवेबाबत शासनाने दखल घेऊन त्यांना गौरविले आहे. त्यांनी यापुढेही अशीच चांगली सेवा बजावावी.

पोलीसांनी आनंदात आणि तणाव मुक्त राहून आपले कर्तव्य करणे आवश्यक आहे. पोलीस विभागाने आपल्याला खूप काही दिले आहे. विभागासाठी काम करतांना आपण काय देतो हे खूप महत्त्वाचे आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावताना चांगले कार्य करून आपल्या विभागाचे नाव नेहमीच उंचावावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार आणि अपर पोलीस आयुक्त डॉ.जालिंधर सुपेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी २८ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह -२०२०(पदक) आणि १५ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल विशेष सेवा पदक -२०२२ ने गौरविण्यात आले.