July 27, 2024

डॉ. प्रमोद चौधरी यांना भारतीय अभियांत्रिकी परिषदेचा प्रतिष्ठित एमीनंट इंजिनिअर पुरस्कार प्रदान

पुणे,  ३ मे : प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना भारतीय अभियांत्रिकी परिषद अर्थात इंजिनीरिंग कौन्सिल ऑफ इंडिया कडून उद्योग श्रेणीतील प्रख्यात अभियंता पुरस्काराने (एमीनंट इंजिनीअर अवॉर्ड) सन्मानित करण्यात आले.  गेल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे कौन्सिलच्या राष्ट्रीय परिषद आणि स्थापना दिवसाचे औचित्य साधत आयोजित राष्ट्रीय परिषदेत डॉ. चौधरी यांना डॉ. व्ही. के. सारस्वत, सदस्य, नीति आयोग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतीय अभियांत्रिकी परिषद अर्थात इंजिनीरिंग कौन्सिल ऑफ इंडिया ही अभियांत्रिकी व्यवसायाची सर्वोच्च  संस्था आहे आणि देशातील अभियांत्रिकी व्यवसायाच्या प्रगतीसाठी कार्य करते. ही संस्था राष्ट्रीय आर्थिक विकासातील अभियांत्रिकी व्यवसायाच्या भूमिकेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर राष्ट्रीय परिषदा आणि विविध उपक्रमांचे आयोजन करत आली आहे.

ECI हा पुरस्कार २०१२ पासून उद्योजकांना अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अनुकरणीय योगदानासाठी दरवर्षी देत आहे. या श्रेणीतील पुरस्काराच्या पूर्वीच्या प्राप्तकर्त्यांमध्ये श्री एन आर नारायण मूर्ती, श्री मुकेश अंबानी, श्री बाबा कल्याणी, श्री नंदन निलेकणी इत्यादी उद्योग जगतातील दिग्गजांचा तर संशोधन श्रेणीतील प्राप्तकर्त्यांमध्ये डॉ. अनिल काकोडकर, प्रा. एम. एम. शर्मा, डॉ. टेसी थॉमस यांचा समावेश आहे.

आपल्या भाषणादरम्यान, डॉ. व्ही.के. सारस्वत, सदस्य, नीति आयोग, यांनी डॉ. प्रमोद चौधरी यांच्या अभियांत्रिकी मूलभूत विज्ञानाशी जोडण्यातील योगदानाचे कौतुक केले. पायाभूत सुविधांच्या विकासासह भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण वाढीमध्ये अभियंत्यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी निदर्शनास आणून दिली.

हा पुरस्कार मिळाल्यावर डॉ.प्रमोद चौधरी म्हणाले, “जैव अर्थव्यवस्थेला मुख्य प्रवाहात आणण्याच्या माझ्या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल आदरणीय परीक्षक समितीचे मी आभार मानतो. हा पुरस्कार प्राजच्या जैवअर्थव्यवस्थेतील नाविन्यपूर्ण योगदानाची केवळ ओळखच नाही तर संपूर्ण जैव ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देणारा आहे. मी हा पुरस्कार माझ्या प्राध्यापकांना आणि मार्गदर्शकांना समर्पित करतो जे नेहमीच माझ्यासाठी प्रेरणास्थान राहिले आहेत.  हा पुरस्कार जैव अर्थव्यवस्थेत अजून नवीन गोष्टी करण्यास मला प्रेरित करेल.”

यावर्षी या पुरस्कारासाठीच्या उच्चस्तरीय परीक्षक समितीमध्ये डॉ. किरीट पारीख (माजी सदस्य, नियोजन आयोग), डॉ. आर.ए. माशेलकर (माजी सचिव, DSIR), श्री बी मुथुरामन (माजी उपाध्यक्ष- टाटा स्टील), डॉ. डी व्ही कपूर (माजी सचिव, अवजड उद्योग आणि संस्थापक अध्यक्ष, NTPC) आणि पूर्वीचे प्रख्यात अभियंता पुरस्कार विजेते- डॉ विजय भाटकर आणि डॉ अनिरुद्ध पंडित यांचा समावेश होता.