पुणे, २० फेब्रुुवारी २०२५: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका निघाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचरा पडलेला होता. पण हा कचरा उचलताना पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थातूरमातूर काम केल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडून होता.
शिवजयंतीनिमित्त शिवाजी रस्ता, लाल महल, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, शिवाजी पूल, एसएसपीएमएस संस्था या मार्गावर मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी विविध मंडळांनी, संस्थांनी शिवकालीन खेळ, युद्ध पद्धतीचे सादरीकरण केले. वाजत गाजत मिरवणूक काढताना मोठ्या प्रमाणात रंगबिरंगी कागदांचे फवारे सोडण्यात आले होते. हा मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांचीही तुडुंब गर्दी झालेली होती. रात्री उशिरा मिरवणुका संपल्या.
मिरवणूक मार्गावर मोठ्याप्रमाणात कचरा पडल्याने तेथे लगेच स्वच्छता करणे आवश्यक होते. महापालिकेच्या कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता झाडताना रस्त्याच्या कडेला बराच कचरा तसाच ठेवला. तेथे झाडू न मारल्याने ठिकठिकाणी कचरा पडल्याचे दिसून येत होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असता सगळी स्वच्छता झाली असल्याचे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात स्थिती वेगळी होती. दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यानंतरही अनेक भागात कचरा पडून होता, त्यानंतर आता शिवजंतीलाही तोच अनुभव आला आहे.
घनकचरा विभागाचे प्रभारी उपायुक्त संदीप कदम म्हणाले , ‘‘मिरवणुकीनंतर रस्ता पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक होते, पण तसे झालेले नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर रस्ते झाडून घेण्यात आले आहेत. तसेच संबंधितांना यासंदर्भात नोटीस बजावली जाईल.’’
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी