पुणे, दि. ०९ एप्रिल २०२५: महापारेषणच्या अतिउच्चदाब रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे पिंपळे सौदागर, सांगवी गाव, रहाटणी परिसरात काल मध्यरात्री ते आज पहाटे तीन तासांच्या कालावधीमध्ये चक्राकार पद्धतीने विजेचे अर्धा ते दीड तास भारनियमन करावे लागले. तर महापारेषणच्या कांदळगाव २०० केव्ही टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आल्यामुळे हिंजवडीमधील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ६६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १२.३० च्या सुमारास ३७ मिनिटे बंद होता.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या रहाटणी १३२/२२ केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेच्या करंट ट्रान्सफॉर्मरमधून काल मध्यरात्री धूर निघाला. अभियंत्यांनी पाहणी केल्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले व त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र यासाठी महावितरणच्या २२ केव्ही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने २२ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली. ही तूट पर्यायी व्यवस्थेतून भरून काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र रात्रीच्या उकाड्यामुळे विजेची मागणी वाढल्याने भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. परिणामी पिंपळे सौदागर, सांगवी, रहाटणी, काळेवाडी, विशालनगर, कस्पटेवस्ती या परिसरात रात्री १२.०३ ते पहाटे २.५८ वाजेपर्यंत अर्धा ते दीड तासांपर्यंत नाईलाजाने चक्राकार भारनियमन करावे लागले.
तसेच आज दुपारी १२.३३ वाजता महापारेषणच्या कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले. त्यामुळे महावितरणच्या ३३ केव्ही क्षमतेच्या १३ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी हिंजवडीमधील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ६६ हजार २०० ग्राहकांचा वीजपुरवठा ३७ मिनिटे बंद होता. त्यानंतर दुपारी १.१० मिनिटांनी वीजपुरवठा सुरळीत झाला.
More Stories
Pune: चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आफ्टर-स्कूल मॉडेलची सुरुवात
PCMC: ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!