पुणे, 17 फेब्रुवारी 2026: वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा अजिंक्यपद सब-ज्युनिअर गटाच्या (१३ वर्षाखालील) फुटबॉल स्पर्धेत मुंबई संघाने पुणे जिल्हा संघाचा प्रतिकार मोडून काढत ३-१ असा विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. पुणे जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गतवर्षी पुणे संघाने स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला होता.
नांदेड येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय, धरमदाबाद येथे झालेल्या या स्पर्धेच्या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पुणे जिल्हा संघाने आक्रमक सुरूवात केली होती. मुंबई संघाच्या गोल कक्षात मुसंडी मारून त्यांनी मुंबई संघाच्या बचाव फळीवर दबाव निर्माण केला. १२ व्या मिनिटाला कौशल बगाळे याने गोल करून पुणे संघाचे खाते उघडून महत्वपूर्ण १-० अशी आघाडी मिळवली. पुर्वार्धात पुणे संघाकडे ही आघाडी कायम होती. उत्तरर्धात मुंबई संघाने पिछाडीवरून अधिक चांगला खेळ केला. रणवीर कुमार याने ३१ व्या मिनिटाला गोल करून मुंबई संघाला १-१ अशी बरोबरी गाठून दिली. त्यानंतर पाचच मिनिटांनी याह्या पी. याने आणखी एक गोल करून मुंबईला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अखेरीस मित सिंग याने गोल करून मुंबई संघाची आघाड ३-१ अशी वाढवून संघाचे विजेतेपद निश्चित केले.
याआधी अंतिम फेरीत वाटचाल करताना पुणे संघाने उपांत्य फेरीत कोल्हापुर संघाचा ४-३ असा, उपांत्यपुर्व फेरीत नांदेड संघाचा १२-० असा तर, उप-उपांत्यपुर्व फेरीत रायगड संघाचा २-० असा पराभव केला होता.
अंतिम सामन्याचा सविस्तर निकालः
मुंबई संघः ३ (रणवीर कुमार ३१ मि., याह्या पी. ३६ मि., मित सिंग ५५ मि.) वि.वि. पुणे जिल्हा संघः १ (कौशल बगाळे १२ मि.); पुर्वार्धः ०-१;

More Stories
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल २०२६ स्पर्धेस १ मार्चपासून सुरुवात
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे आव्हान संपुष्टात
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या मानस धामणेची विजयी आगेकूच