June 24, 2024

पुण्याच्या माजी महापौर त्रिभूवन यांचे निधन

पुणे, १५ मे २०२४ : पुणे शहराच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्रिभुवन यांच्या भावाचे निधन झाले होते. त्यामुळे त्या भावाच्या अंत्यदर्शनासाठी गेल्या होत्या. येथे अत्यंत भावनिक झाल्याने त्या रडल्या होत्या. यानंतर मात्र त्यांना त्रास जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाऊ आणि त्या पाठोपाठ बहिणीचे निधन झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

रजनी त्रिभुवन या सन २००४ ते २००६ या दोन वर्षांच्या काळात पुणे शहराच्या महापौर होत्या. महापौर पदाच्या काळात त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचेन निर्णय घेतले. सर्वसामान्यांच्या समस्या मार्गी लावण्यावर त्यांचा नेहमी भर असायचा. शहरातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने माजी महापौरांनी एकत्र येत एक संघटना स्थापन केली. या संघटनेत रजनी त्रिभुवन यांचाही समावेश होता.

या संघटनेच्या माध्यमातून माजी महापौरांनी शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची समस्या, पाणीपुरवठा यांसारख्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. शहराच्या माजी महापौरांनी एकत्र येत संघटना स्थापन करण्याची घटना बहुधा पहिलीच असावी. काँग्रेस पक्षात रजनी त्रिभुवन यांनी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.