October 14, 2025

शनिवारवाडा ते स्वारगेट चौपदरी भुयारी मार्ग प्रकल्पाला गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे, २३ जून २०२५ : शहरातील मध्यवर्ती भागातील तीव्र वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रस्तावित शनिवारवाडा ते स्वारगेट चौपदरी भुयारी मार्ग प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधीची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असून, गडकरी यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

गडकरी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी शनिवारवाडा मुख्य प्रवेशद्वार व काकासाहेब गाडगीळ पुतळा परिसरात भेट देऊन प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. आमदार रासने यांनी गडकरी यांना अधिकृत निवेदन सादर करत प्रकल्पाच्या उभारणीसाठी केंद्र पुरस्कृत निधीची मागणी केली.

शनिवारवाडा, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे पुणे शहरातील मुख्य वाहतुकीचे मार्ग असून दररोज लाखो वाहनांची वर्दळ या भागातून होते. परिणामी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून २.५ किलोमीटर लांबीचा चौपदरी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास सुरुवात केली आहे. अहवाल अंतिम टप्प्यात असून पुढील १५ दिवसांत पूर्ण होणार आहे. निधी मिळवण्यासाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले, “शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता यांसारख्या मध्यवर्ती भागात कायमस्वरूपी वाहतूक सुलभीकरणासाठी भुयारी मार्ग अत्यंत आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. माझं हे एक स्वप्न असून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

शनिवारवाड्याच्या वैभवासाठी विशेष मागणी
शनिवारवाडा हे मराठा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास जपणाऱ्या या वास्तूच्या जतनासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही आमदार रासने यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.